नाशिक : गुरुवारी रात्री नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण नियुक्त होणार, याची सर्वाना उत्सुकता लागली होती. पण आज याला पूर्णविराम मिळाला असून कॅटच्या आदेशानुसार मुंबईचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी आज शुक्रवारी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
काल रात्री राज्य सरकारने राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या होत्या. त्यात नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीचा समावेश होता. गुरुवारी सचिन पाटील यांची औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली केली आहे. पाटील यांच्या जागी कोण येणार, याचा निर्णय तेव्हा घेण्यात आला नव्हता. पण केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या आदेशानुसार शहाजी उमाप यांना पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांनी आज आडगाव येथील मुख्यालयात येत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
खरेतर, सचिन पाटील यांची बदली ही गेल्यावर्षी ९ सप्टेंबरला झाली होती. मात्र त्यांनी या बदलीच्या विरोधात त्यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती, तेव्हा कॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. मात्र गेल्याच महिन्यात या स्थगितीबाबत कॅटने निकाल देताना त्यांची स्थगिती उठविली होती. आणि शासनाला पाटील यांच्या बदलीचे आदेश देताना उमाप यांची नियुक्ती महिनाभरात करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज उमाप यांची ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे.
नवे अधीक्षक शहाजी उमाप यांचा अल्प परिचय
शहाजी उमाप हे पुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) येथील असून करड्या शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. याआधी ते मुंबई पोलीसच्या उपायुक्तपदी कार्यरत होते. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. १९९६ मध्ये नवी मुंबई पोलीस अतिरीक्त आयुक्तपदी असताना झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उपअधीक्षकांमध्ये ते पहिले आले होते. त्यानंतर २०१६ साली ते भारतीय पोलिस सेवेत वर्ग झाले आहे. त्यांनी जवळपास अनेक ठिकाणी काम केले असून आंबेजोगाई, लातूर, कोल्हापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून, तर पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कोल्हापूर व नांदेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, २०१२ मध्ये ते नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यावेळी झालेल्या तंटामुक्ती योजनेत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक गावे तंटामुक्त केली होती. त्यामुळेच नांदेड जिल्हा तंटामुक्ती योजनेमध्ये राज्यात प्रथम आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम