क्षितीज लोखंडे, द पॉईंट नाऊ
राज्याच्या राजकारणात कधीपण, काहीपण होऊ शकते, हे आजवर आपण सगळ्यांनी अनुभवलंय. शिवसेनेतील जे नेते आजवर राज ठाकरे यांच्यावर अनेक टीका करत होते, त्यातील काही नेते गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या भेटीला जातात. त्यांच्या हाकेला साथ देतात, त्यांच्या निमंत्रणाला मान देत कार्यक्रमात हजेरी लावतात. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिसून आली आहे.
कारण निमित्त होते दिवाळीचे, मनसेच्या दीपोत्सवाचे. एरवी आपण सर्वांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा एकत्र पहिले. पण आज मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सव २०२२ उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीनही नेते प्रथमच एकत्र आले. दरम्यान, या तिघांचे मिलन पाहता राज्याच्या राजकारणात नवीन डाळ शिजणार आहे का, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या वतीने दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे ह्याला काहीशी मर्यादा लागलेली होती. पण यंदा मात्र, पूर्ण उत्साहात पार पडणार असल्याने राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत प्रथमच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या दीपोत्सवाचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत आज दीपोत्सवाच्या उद्घाटनाला या दोन्ही नेत्यांनी हजरी लावली होती. व त्यांच्याच हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन पार पाडण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देत राज ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच गेल्या १० वर्षापासून इथे दीपोत्सव साजरा होत आहे. मात्र, कोविडमुळे दोन वर्षे इच्छा असूनही आपल्याला दिवाळी नीट साजरी करता आली नाही. पण यंदा राज ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दिवाळीची सुरुवात केल्याचे म्हणत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, देवेंद्र फडणवीसांनीही याठिकाणी जो प्रकाश पडला आहे, तोच प्रकाश आपल्याही आयुष्यात यावा. सर्वाना सुख-समृद्धी व ऐश्वर्य द्यावे व सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावेत, असे म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान हे तीन नेते जरी एका मंचावर पहिल्यांदाच एकत्र आले असले, तरी त्याआधीही ते अनेक प्रसंगी वेगवेगळे एकत्र आले होते. शिंदे व फडणवीसांनी सर्वप्रथम राज यांच्या नव्या घरात आलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर राज यांनीही या दोघांच्या गणपतीचे दर्शन घेतले. नंतर अंधेरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज यांनी या दोघांना पत्रव्यवहार केला होता, तेव्हा त्यांनी राज यांच्या विनंतीला मान देत निर्णय घेतला होता. हे सर्व पाहता काही दिवसांनी जर मनसे-भाजप-बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती झाल्याची पाहायला मिळाली, तर काही सांगायला नको.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम