Skip to content

नाशिककरांना सुकामेव्याच्या दरवाढीची झळ! ; डींकाच्या लाडूंचा डबा रिकामाच


नाशिक प्रतिनिधी : दिवाळी संपली की फराळातील लाडवांचे डबे रिकामे झाल्यावर अनेकांना मेथी आणि डिंकाच्या लाडवांचे वेध लागतात. थंडीचा जोर वाढू लागला की आरोग्याच्या दृष्टीने हे पौष्टीक लाडू करण्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू होते. मात्र यंदाच्या वर्षी भाजीपाला, खाद्यतेलांच्या वाढत्या किंमतीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना सुकामेव्याच्या दरवाढीची झळ सोसावी लागत असल्याने हे पौष्टीक लाडूही महाग होणार आहेत.

सध्या सुकामेव्याच्या किंमतीमध्ये २० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी सतत ची घसरण दरवाढीमागचे महत्त्वाचे कारण असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी जोम धरू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सुकामेवा, डिंक आणि मेथीच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु मागणी वाढल्याने दरांतही वाढ होत आहे. शहरात केवळ किसमिस आणि काजू भारतातून आयात होत असून इतर सर्व सुकामेवा गल्फ या देशांसह सर्वाधिक प्रमाणात अफगाणिस्तानाहून आयात केला जातो. गेल्या वर्षभरापासून अफगाणिस्तानातून होणारी ही आयात कमी झाली आहे. यासोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यदेखील सातत्याने घसरत आहे. कमी झालेली आयात आणि रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होत असून, सर्वसामान्य ग्राहकांना महागाईशी सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेल दरांमध्ये वाढ होत आहे. दिवाळीपासून स्थानिक बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे साडेतीनशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये मागणीत झालेली वाढ आता कमी होत असल्याने पुढील काही दिवसांत खाद्यतेलांच्या दरांत घसरण होण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता पाऊस थांबला असला तरी भाजीपाल्याची आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे कारले, टोमॅटो, दुधी भोपळा, घेवडा या फळभाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आहेत. यातही शेवगाची आयात कमी असल्याने त्याचे दर प्रतिकिलो दोनशे रूपये पार गेले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!