नाशिक – गेल्या काही दिवसांपासून देशभरात लंपी आजारामुळे असंख्य गुरे दगावली होती. जिल्ह्यातही ह्या आजाराचे अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर हा आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे.
जिल्हा परिषदेकडून लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने पशुसंवर्धन विभागामार्फत आपल्या सेस निधीतून एक लाख ५ हजार ३०० प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, प्रशासनाने आतापर्यंत सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या लंपी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या व त्या आसपासच्या गावांतील ८ हजारांहून अधिक गोवर्गिय जनावरांचे लसीकरण पुर्ण केले आहे. त्यात सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द, मिठसागरे, फुलेनगर, मलढोन, वावी, पिंपरवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी व सायाळे ह्या गावांचा समावेश आहे.
लंपी आजार हा गोचीड, गोमाश्या, डास, मच्छर यांच्या चाव्याने पसरत असल्याने या आजारास प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १५व्या वित्त आयोगामधून प्रत्येक गावात फवारणीचे औषध उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांना यापूर्वी दिल्या आहेत. तसेच, ह्या लसीकरणासाठी पशुपालकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
यासोबत लंपी आजार बाधित गावापासून ५ किमी परिसरात येणाऱ्या गावातील तीन महिने वयोगटावरील सर्व गोवर्गिय जनावरांचे जवळच्या पशुवैद्यकिय दवाखान्यांमार्फत लसीकरण करून घ्यावे व पशुपालकांनी आजार नियंत्रणात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम