Skip to content

मनपाचा ‘नाशिक झिलर्स’ संघ स्वच्छता लीगसाठी सज्ज


नाशिक – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने आयोजित ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये नाशिक महापालिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. 

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्वच्छता अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये उद्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धा घेतली जात आहे.

ह्या स्पर्धेत मनपाचा “नाशिक झिलर्स” संघ सहभागी होत असून संघाचा कर्णधार अभिनेता चिन्मय उदगीरकर आहे. राजीव गांधी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघाचा लोगो, झेंडा, टी-शर्टचे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिनेता चिन्मय उदगीरकर म्हणाला, देशात नाशिक शहर सुंदर असून त्याला स्वच्छतेची झालर द्यायची आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नाशिककरांसाठी ही मोठी संधी आहे. यावेळी आयुक्तांनी इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत शहरातील जास्तीत जास्त युवक, सामाजीक संस्था, शाळा, महाविद्यालये यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी या स्पर्धेबाबतची अधिक माहिती दिली. यावेळी पांडवलेणी येथे उद्या होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते होणार असून खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परिषदेला अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यावेळी उपस्थित होते.

उद्या तीन ठिकाणी राबवणार ही मोहीम 

यावेळी महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ७ वाजता शहरातील पांडवलेणी, फाळके स्मारक व चांभारलेणी येथे ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. स्पर्धेसाठी शहरातून जवळपास ९०० जणांनी सहभाग नोंदवला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!