Nashik Political | विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्यापूर्वी नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून राजकारण तापले होते. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेले दोन टर्म विद्यमान आमदार सीमा हिरे कार्यरत असून आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यास संधी मिळावी अशी भूमिका मांडत सीमा हिरे यांच्या उमेदवारीला भाजपातील पश्चिम मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी कडाडून विरोध केला होता. ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु एवढे असूनही पक्षाकडून सीमा हिरेंना तिसऱ्यांदा संधी दिल्याने पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला.
Nashik Political | नाशिक पूर्व मधून भाजपाला धक्का; बडा नेता फुंकणार तुतारी?
दिनकर पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दरम्यान, मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भाजपकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी समर्थकांचा निर्धार मेळावा घेत अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दिलीप भामरे, प्रदीप पेशकार, मयूर अलई, शशिकांत जाधव या इच्छुकांनी देखील नामनिर्देशनपत्र घेतल्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी निश्चित मानली जात आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून जास्त इच्छुक होते. यामधील काही इच्छुकांनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उघड भूमिका घेत त्यांना तिकीट देऊ नये अशी भावना पक्षाचे समोर व्यक्त केली होती. परंतु भाजपच्या पहिल्या यादीतच त्यांना उमेदवारी घोषित झाल्याने इच्छुक सैरभैर झाले असून काहींनी पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या भावना बोलून दाखवल्या, असून काही इच्छुक शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे गटात इन्कमिंग होणार?
दरम्यान, विद्यमान आमदार हिरे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर इच्छुक पुढील रणनीती ठरवत असल्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजकारण चांगलेच पेटले असून इच्छुकांनी सुरुवातीला आपल्यातीलच एकाला अपक्ष उमेदवारी करण्यास गळ घालत त्याच्याच पाठीशी ताकद उभी करण्याचा पर्याय पुढे ठेवला होता. परंतु या पर्यायावर एकमत न होऊ शकल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चाचपणी करण्यास काहींनी सुरुवात केली आहे तर मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र विक्रीस व दाखल करण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी वेळ न घालवता नामदर्शन पत्र खरेदी करत मैदानात उडी घेतली आहे. दुसरीकडे दिनकर पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेत अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम