Political News | विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नाशिक मधून राज ठाकरेंना मोठा धक्का बसला असून नांदगाव मतदारसंघामध्ये मनसेच्या उमेदवाराने मनसेला रामराम ठोकत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
मनसेच्या उमेदवाराने हाती बांधले शिवबंधन
नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरे गटात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोनावला यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा जाहीर करत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. नाशकात राज ठाकरेंना बसलेला हा दुसरा धक्का असून मनसेचे प्रदेश सरचिटणीस व नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोडचिट्टी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. नाशिक विधानसभा मतदारसंघात मुर्तडक निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु त्यांच्या ऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
Political News | नांदगावात राजकारण पेटले; समीर भुजबळांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न!
अमरावतीत प्रहारला धक्का
दुसरीकडे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अबरार यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. तर अबरार यांचा तो वैयक्तिक निर्णय असून प्रहार जनशक्ती पक्षाने कोणताही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे सांगत आगामी काळात पक्षप्रमुख बच्चू कडू यावर निर्णय घेतील. असे सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. अबरार यांच्या कुटुंबीयांना अज्ञातांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. असा दावा देखील प्रहारचे प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने यांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम