Skip to content

१ तारखेपर्यंत नाशिक-मुंबई महामार्ग दुरुस्त करा, अन्यथा टोल बंद करू – भुजबळांचा इशारा


नाशिक : जर येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्त न झाल्यास १ नोव्हेंबरपासून या महामार्गावरील टोल बंद करू, असा इशारा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे महामार्गावरील रस्त्यांना खड्डे पडले असून या नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. तसेच या मार्गावरील रस्ते अत्यंत निकृष्ट असल्याने येथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून परिणामी येथे अपघाताच्या घटना सतत घडत असतात.

या दुरवस्थेची दखल माजी मंत्री भुजबळ यांनी घेतली असून त्यांनी बुधवारी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरीदरम्यान महामार्गावरील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी भुजबळ यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्डे दाखवत चांगलेच फैलावर घेतले. व येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. तसेच जर येत्या ३१ तारखेपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या महामार्गावरील टोल बंद करू, असा इशारा देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सज्जड दमही त्यांनी दिलेला आहे. यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी, सदर टोल कंपनीचे संचालक व अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी देखील भुजबळांनी सदर महामार्गावरील दुरवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले असून भुजबळ यांनी प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चाही केली होती. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीव्दारे संपर्क करत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशा सूचना केल्या. तेव्हा प्राधिकरणाकडून १५ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनही रस्ते दुरुस्त न झाल्यामुळे भुजबळ आक्रमक झाले होते. त्यामुळे काल त्यांनी थेट अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!