MPSC Exam | विद्यार्थ्यांचं आंदोलन फळलं..!; MPSC चा मोठा निर्णय

0
36

MPSC Exam : MPSC ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा व आयबीपीसची पदभरती परीक्षा आयोगाकडून एकाच दिवशी ठेवण्यात आल्यामुळे स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. MPSC व IBPS या दोन्ही परीक्षा 25 तारखेला ठेवण्यात आल्या होत्या. या कारणामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनातून आपली मागणी आयोगासमोर मांडली. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवार 20 ऑगस्टला संध्याकाळी पासून आंदोलन करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची खबर अनेक राजकीय नेत्यांकडून घेण्यात आली. इतकेच काय तर महाविकास आघाडीचे काही नेते या आंदोलनात सहभागी ही झाले. त्यानंतर मात्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदर प्रकरणावर भाष्य करत आयोगाच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती केली. त्यानंतर आयोगाकडून आज सकाळी 10 वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 25 ऑगस्टला होणारी MPSCची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

मविआकडून आंदोलनाला पाठिंबा

20 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थिती लावत पाठिंबा दर्शवला. आमदार रोहित पवार यांनी रात्रभर विद्यार्थ्यांसोबत थांबून आंदोलनात सहभाग घेतला. एवढेच नव्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, “जर सरकारने या आंदोलनावरती लक्ष दिले नाही तर, मी स्वतः आंदोलनात सहभागी होईन.” असे वक्तव्य करत सरकारला इशारा दिला होता.

विद्यार्थ्यांची नेमकी अडचण काय? 

लोकसभा निवडणुका, आरक्षण व इतर कारणामुळे आयोगाने MPSC ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलत होते. शेवटी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी रविवार 25 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आली, परंतु आयबीपीएसकडून 25 तारखेलाच त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील विविध पदभरतीसाठीची परीक्षा आयोजित केली असल्याचे चित्र समोर आले. खरतरं वर्षभरापूर्वीच आयबीपीएस ने ही घोषणा केली होती आणि नेमकी तेव्हाच एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा घोषित केल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केले होते त्यांना एका परीक्षेला मुकावा लागलं असतं. दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर मेहनत केली असून सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत फुकट गेली असती. याच गोष्टीचा निषेध करत विद्यार्थ्यांनी मंगळवार सायंकाळी आयोगाकडे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या हेतूने आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाला आज सफलता मिळाली. आयोगाने 25 तारखेला घेतली जाणारी एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली असून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here