ऋतुजा लटके यांच्याविरोधात कोण लढणार ? आज रात्री ठरणार उमेदवार

0
29

मुंबई : आज मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटात यावर अद्यापही खलबत्ते सुरु आहेत.

अंधेरी-पूर्वची जागा पूर्वीपासून भाजपच्या ताब्यात असताना आता शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजप नेत्यांनी यावर एकत्रित चर्चा करत मार्ग काढण्यात येत आहे. मात्र, अजूनही यावर निर्णय झाला नसून आज मध्यरात्रीपर्यंत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. आज रात्री वर्षा बंगल्यावर यासंबधीची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात भाजपचे मुरजी पटेल यांचे नाव निश्चित करण्याची शक्यता आहे. म्हणजे, शिवसेनेच्या ऋतुजा लटके व भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

भाजपचे मुरजी पटेल यांनी यापूर्वीही मागील निवडणूक लढवली असून ते रमेश लटके यांच्याकडून हरले होते, त्यावेळी ते अपक्ष म्हणून लढले होते. मात्र ते यंदा भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता दिसत आहे. पण असेही बोलले जात आहे की, मुरजी पटेल यांना शिंदे गटातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या सहानुभूतीचा विचार करता मुरजी पटेल यांना भाजपमधून नव्हे, तर शिंदे गटातून उमेदवारी देण्यात यावी, असा मतप्रवाह असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांना भाजपातून की शिंदे गटातून उमेदवारी मिळणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक मुरजी पटेल यांना फोनची वाट पाहण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहे.

तिकडे उद्या अंधेरी-पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सुटला असून त्या उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत. पण भाजप आणि शिंदे गटात ही जागा नेमकी कोण लढणार, याबाबत काहीही ठरले नसून आज रात्रीच्या बैठकीनंतर निवडणुकीसाठी एबी फॉर्म मिळवण्यापूर्वी मोठी घडामोड होण्याची चिन्हे दिसत आहे.

दरम्यान, भाजप नेते मुरजी पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहे. मात्र, रमेश लटके यांनी त्यांच्या पराभव केला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर त्यांना भाजपचे तिकीट फिक्स होते. मात्र, पण शिवसेनेतील फुटीनंतर आता शिंदे गटाने दावा केल्याने ही जागा शिंदे गटाला सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पटेल यांनी जर पक्षादेश आल्यास आपण माघार घेऊ, असे सांगितले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here