Skip to content

‘इतकी संपत्ती कुठून आणली’ म्हणत भुजबळांनी सांगितला आपल्या जीवनाचा संघर्ष


मुंबई : लोक मला विचारायचे की एवढी संपत्ती तुम्ही कुठून आणली, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या आयुष्यात आलेला संघर्ष सांगितला होता. त्यांनी या संघर्षाचे वर्णन करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आज ७५ वर्षाचे झाले आहेत. त्यानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, जावेद अख्तर, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी त्यांच्या संघर्षाचा प्रवास सांगितला.

यावेळी आपल्या संघर्षाचा प्रवास सर्वांसमोर सांगताना छगन भुजबळ काहीसे भावूक झाले होते. यावेळी भुजबळ म्हणाले, माझा मोठा भाऊ व मी खूप कष्ट घेतले. आम्ही लहान असताना आम्ही मार्केटला भाजी आणायला जायचो. तिथून भाजी आणायची, व नंतर ती माझगावला फुटपाथवर विकायचो. त्यानंतर हळूहळू आमचा धंदा वाढत गेला, मी शिक्षणही करायचो. त्यावेळी मलन बंधू नावाने आम्ही आरसीएफ, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन अशा मोठमोठ्या कंपन्यांची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट आम्ही मिळवली. त्यानंतर आम्ही दररोज ट्रकलोड भाजी पाठवायचो.

पुढे अजिवारीमध्ये एक रब्रेक्स नावाची कंपनी बंद पडलेली होती, ती चालवायला घेतली. बेस्ट गाड्यांच्या टायर रिमोल्डिंगचे काम माझ्याकडे यायचे, त्यानंतर दुसरी कंपनी पनवेलमध्ये घेतली. त्यातून पुढे मुंबई आणि गोव्यातील पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स सुरु केली. नंतर सिनेमे काढले, असे अनेक उद्योग सुरु होते. तरीही लोक मला विचारतात की, एवढी संपत्ती तुम्ही आणली कुठून ? त्यांना इतकेच सांगतो, ही संपत्ती कमावण्यासाठी आम्ही लहानपणापासून मेहनत घेतली आहे. अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या संपत्तीबाबत स्पष्टोक्ती दिली आहे.

पहिला शिवसेना शाखाप्रमुख होण्यापर्यंतचा प्रवास 

यावेळी भुजबळ यांनी आपल्या जुन्या आठवणीना यावेळी उजाळा दिला. ते म्हणतात, जेव्हा ७५ वर्षांचा आयुष्याचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून जातो. दोन-चार दिवसांत विचार करायला लागलो. नाशिकचा जन्म माझा. पण ज्यावेळी कळत नव्हते, तेव्हा आई-वडील दोघेही गेले. तेव्हा आईच्या मावशीने मला माझगावला आणले. १० बाय १२ फुटाच्या पत्राच्या घरात मी व माझा भाऊ आम्ही लहानाचे मोठे झालो. म्युनिसीपालीटीच्या दिव्याखाली शिकलो, माझगावच्या डोंगरावर जायचो वाचायला.

त्यावेळी बीएमसीच्या शिक्षकांनी प्रेम केलं, पुस्तक तेच देत, सहलीला तेच घेऊन जात, बोलायचे कसे हेही त्यांनीच शिकविलं, ते मांडायचे कसं, त्याचे बाळकडू त्यांनीच पाजले. त्यानंतर चांगले मार्क्स मिळवत मेरीटमध्ये आलो, एनसीसीत गेलो, वीजेटीआय कॉलेजला प्रवेश मिळाला, तिथे अभिनयात भाग घेतला आणि पहील बक्षीस मिळवले.

हे सर्व करत असताना बाळासाहेब ठाकरेंची सभा शिवाजी पार्कवर झाली, तेव्हा मी कॉलेजमध्ये सेक्रेटरी होतो. बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी लढतात. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायला हव्या असे विद्यार्थी म्हणायचे, म्हणून आम्ही शिवाजी पार्कमध्ये गेलो. सभेला प्रबोधनकार ठाकरे, रामराव आदिक, दत्ताजी साळवे होते. त्यावेळचे बाळ ठाकरे होते. नंतर घरी आलो, तेव्हा माझगावचे लोक मला म्हणाले भुजबळ तुम्ही शाखा प्रमुख व्हा. पहिले दहा-पंधरा शाखाप्रमुख झाले, त्यातला मी एक शाखाप्रमुख होतो, असे ते यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!