दिल्ली : अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते व खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार शशी थरूर यांचा पराभव केला आहे. यासह कॉंग्रेसमध्ये तब्बल २४ वर्षांनी आज बिगर गांधी घराण्यातील व्यक्तीची कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता ८० वर्षाचे मल्लिकार्जुन खर्गे हे आता नरेंद्र मोदी यांना टफ ‘फाईट’ देणार असून तरुणाईचा देश म्हणून भारताकडे बघितले जाते आणि या देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष वयवृद्ध नेत्याला काँग्रेसच्या सर्वोच्च पदी बसून भाजपाला कितीपत थोपवणार हे येणारा काळच सांगेल.
यंदा २४ वर्षांनी पार पडलेल्या या निवडणुकीत तब्बल ९९०० पैकी ९३८५ जणांनी मतदान केले होते, त्यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता होती. आज पार पडलेल्या मतमोजणीत खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. या निवडणुकीत खर्गे यांना ७८९७ मते मिळाली आहे, तर थरूर यांना १०७२ मते मिळाली आहेत. तर ४१६ मते ही बाद झालेली आहेत. कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. निकालानंतर खासदार शशी थरूर यांनी नवे अध्यक्ष खर्गे यांचे अभिनंदन करत मतदान करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
खर्गे यांच्यासमोर आव्हान मोठे; पण अनुभव आहेत तगडे
काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर अनेक आव्हानांचे डोंगर आहे. मात्र, त्यांचा राजकारणातील अनुभव व पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीची जाण त्यांच्या लक्षात असल्यामुळे आधी खर्गे यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. कारण, गांधी घराण्यावर काही नेत्यांच्या गटाची असलेली नाराजी, पक्षातील नेत्यांमधील आपापसातील वाद मिटवणे, आणि कॉंग्रेसला नवचैतन्य देण्याचे मोठे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे. पण त्यांच्या पक्षातील अनेक नेते व गांधी घराण्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांना हे आव्हान जास्त कठीण जाणार नाही.
मात्र, सध्या जनतेमध्ये सत्ताधारी पक्षाविरोधात असलेला रोष, तसेच जनतेच्या अनेक मुद्दे व समस्येशी जोडण्याचे आव्हान कॉंग्रेससमोर असून त्यासाठी योग्य नियोजन करण्याचे आव्हान खर्गे यांच्यासमोर आहेत. कारण पक्षासमोर नरेंद्र मोदीचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळेच कॉंग्रेसला भाजपविरोधात असलेल्या विरोधकांना एकत्र आणणे आणि त्यांची मोट बांधण्याची जबाबदारीही खर्गे यांच्या खांद्यावर असणार आहे.
तसेच, आगामी हिमाचल प्रदेश, गुजरातची व त्यांनतर होणाऱ्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणूक, तसेच दोन वर्षांनी होणारी लोकसभा निवडणूक आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. सध्या तरुणाईचा देश म्हणून भारताकडे बघितले जाते, आणि या देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष वयवृद्ध नेत्याला काँग्रेसच्या सर्वोच्चपदी बसून भाजपाला कितीपत थोपवणार हे येणारा काळच सांगेल.
राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खर्गे यांच्या निवडीबद्दल भाष्य करण्यास टाळले आहे. ते सध्या भारत जोडो यात्रेवर असून आंध्रप्रदेशात आज पोहोचले आहे. दरम्यान, आता खर्गे यांची काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल यांची नेमकी भूमिका काय असेल ? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यावर बोलताना राहुल गांधींनी स्पष्टीकरण देत म्हणाले, की मी यावर प्रतिक्रिया देणे टाळत असून माझी काय भूमिका असेल, यावर मल्लिकार्जुन खर्गे निर्णय घेतील, असे राहुल गांधी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम