देवळा | सोमनाथ जगताप
बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेतील आर्थिक अपहारातील फसवणूक झालेल्या शेतकरी खातेदारांपैकी आज पहिल्या टप्प्यात मुदत ठेव म्हणुन बॅंकेत जमा केलेल्या ३९ खातेदारांचे १ कोटी ९१ लाख रुपये आ.डॉ.राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि१९) रोजी वर्ग करण्यात आले.
यामुळे फसवणूक झालेल्या खातेदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँक घोटाळ्यात जवळपास पन्नास खातेदारांची २ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे .या घोटाळा प्रकरणी पाच जणांना अटक केली होती .फसवणूक झालेल्या खातेदारांची गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संभाजीनगर येथे हॉटेल रामा इंटरनॅशनल मधे राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या उच्चस्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित केलेली होती .
यावेळी भऊर महाराष्ट्र बँकेतील फसवणूक झालेल्या खातेदारांच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थ राज्य मंत्र्यांची भेट घेऊन हा गंभीर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र बँकेचे कार्यपालक निदेशक विजयकुमार यांच्यासोबत चर्चा केली व तात्काळ चौकशी करून खातेदारांना न्याय देण्याचे निर्देश दिले होते. बँकेचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार यांनी आठ दिवसांत स्वतः भऊर येथे येऊन चौकशी करून खातेदारांना त्वरित न्याय देऊ असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले होते .
या शिष्टमंडळाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असुन ,येन दिवाळीत फसवणूक झालेल्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे . यातील पहिल्या टप्प्यातील मुदत ठेव म्हणुन बॅंकेत जमा केलेल्या ३९ खातेदारांचे १ कोटी ९१ लाख रुपये आ.डॉ.राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि१९) रोजी वर्ग करण्यात आल्याने खातेदारांची समाधान व्यक्त केले आहे . तसेच या कामी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार डॉ राहुल आहेर यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. उर्वरित खातेदारांचेही लवकरच पैसे वर्ग करण्यात येतील असे आश्वासन यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, अभिमन पवार आदींसह बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीराम भोर तसेच खातेदार शेतकरी उपस्थितीत होते.
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले ६ लाख ७५ हजार रुपये भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मुदत ठेव म्हणून जमा केले होते . त्या पैशांचा अपहार झाला होता . यामुळे माझ्यावर आर्थिक संकट कोसळले होते . मात्र आमदार डॉ राहुल आहेर यांच्या माध्यमातून मला न्याय मिळाला व माझे सर्व अपहार झालेले पैसे व्याजासह मिळाल्याने समाधान वाटले . व सुटकेचा निश्वास सोडला – अशोक निकम , देवळा ( सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा बँक )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम