त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे भाविकांना अल्पदरात महाप्रसाद

0
4

 

द पॉईंट नाऊ: त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी विविध विकासकामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. भाविकांच्या दर्शन बारीच्या सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता भाविकांसाठी महाप्रसाद (भोजन) उपलब्ध होण्यासाठी ट्रस्टच्या शिवप्रसाद या इमारतीमध्ये काम सुरू असून, येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण होऊन लवकरच भाविकांना अल्पदरात महाप्रसाद या ठिकाणी उपलब्ध होईल, अशी माहिती विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम व भूषण आडसरे यांनी दिली आहे.

भाविकांसाठी विविध सोयीसुविधा त्र्यंबकेश्वर ट्रस्टतर्फे पुरवण्याचे काम सुरू आहे. या कामांमध्ये भाविकांना पूर्व गेट हे दर्शनबारीचे मुख्य केंद्र असून, तेथे एकावेळेस हजार दीड हजार भाविक मावतील, अशा स्टीलच्या सुबक दर्शनबारी उभारल्या आहेत. त्यावर भव्य असा वातानुकूलित सभामंडप उभारला आहे. या स्टीलच्या दर्शनबारीत बसण्यासाठी आसने असून, जाण्या येण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवले आहे. तसेच शुद्ध पिण्याच्या थंडगार पाण्याची सोय केली आहे.

याशिवाय कुलूमनालीच्या धर्तीवर असलेले अत्याधुनिक स्वयंचलित ई टॉयलेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात; परंतु या ठिकाणी भाविकांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नव्हत्या.

या सर्व बाबींचा अभ्यास करून विश्वस्त मंडळाने भाविकांच्या दर्शन रांगेचे काम प्राधान्याने हाती घेतले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये महाप्रसादाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. त्यानुसार त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या’ शिवप्रसाद या जीर्णोद्धारीत इमारतीत भाविकांना अल्पदरात महाप्रसाद-भोजन मिळेल, या दृष्टीने कामकाज सुरू आहे. देवस्थानचे प्रसादालय असलेल्या शिवप्रसाद इमारतीमध्ये नूतनीकरण केलेले ३५ रूम व दोन मोठे हॉल भाविकांसाठी अल्प दरात उपलब्ध होणार आहेत. विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसरे यांनी सुरू असलेल्या कामांची नुकतीच पाहणी केली.

देवस्थानची ४८० एकर जमीन

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची जवळपास ४८० एकर जमीन असून, निफाड तालुक्यामध्ये विंचूर येथे ४०९ एकर, जळगाव जिल्ह्यात १८ एकर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३० एकर तर त्र्यंबकेश्वर येथे ३० एकर मालकीची जमीन आहे. या सर्व जमिनीची पाहणी व माहिती घेण्यासाठी लवकरच विश्वस्त मंडळ व प्रशासन या ठिकाणी दौरा करणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here