दिंडोरी – तालुक्यातील सोनजांब येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुदैवाने शेतकरी या हल्ल्यातून बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोनजांब येथील शेतकरी बाकेराव हरी जाधव (६०) हे घरातील पाणी भरण्याकरिता मोटर सुरू करण्यासाठी आपल्या शेतातील विहिरीकडे जात असताना अचानक त्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनी बिबट्यावर जोरदार प्रतिकार केला व त्वरित आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत त्यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आहे.
दरम्यान, या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मानेला, गळ्याला, तसेच पायाला मोठ्या प्रमाणत जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खेडगाव येथे आणले असता त्यांना मोठ्या प्रमाणत टाके पडले आहे. तिथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील सोनजांब, जवळके वणी, गोंडेगावात अनेकदा बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून इथल्या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांची कुत्रे, शेळ्या व अन्य जनावरे फस्त केलीत आहे. तसेच शेतकऱ्यांनी वारंवार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असता अद्यापही ह्या परिसरात पिंजरा लावण्याची तसदी वनविभागाने घेतलेली नाही.
त्यामुळे वनविभाग आता शेतकरीवर्गाची शिकार होण्याची वाट बघत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तरी, लवकरात लवकर वनविभागाने या परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम