बागलाण – सध्या राज्यभर पसरलेल्या लंपी आजाराचा शिरकाव आता बागलाण तालुक्यातही झाला असून आतापर्यंत सात जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याची प्राथमिक माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
तालुक्यातील एक लाख पाच हजार जनावरांना लंपी रोगापासून वाचविण्यासाठी तालुका प्रशासन सरसावला असून पाहिल्या टप्यात ५ हजार लसींच्या डोसची मागणी करण्यात आल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सी. पी. रुद्रवंशी यांनी दिली आहे. तसेच तालुकास्तरावर लंपी आजारांवरील औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
तालुक्यातील कोटबेल, मुंजवाड, पिंपळदर या गावांमध्ये लंपीबाधित जनावरे आढळून आल्याने तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५००० लसी उपलब्ध करण्यासाठी विभागाने वरिष्ठस्तरावर मागणी केली आहे. तरी बहुतांशी पशुपालक हे खाजगी लस आपल्या जनावरांना देत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण तालुका लंपीमुक्त करण्याचा मानसही बोलून दाखवला आहे.
लंपी आजार हा सहसा गाय, म्हैस, बैल व अन्य पाळीव जनावरांमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांनी याकाळात काळजी घेण्याचे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभागाने केले आहे. यासाठी संध्याकाळच्या वेळेस जनावरांच्या गोठ्यात डास, मच्छर, चिलटे व अन्य चावणारे कीटक येऊ नयेत, यासाठी गोठ्यात धूर करावा. कडूनिबाचा पाला जाळण्यात यावा. दोन जनावरे यांच्या मध्ये अंतर ठेवावे. गोठ्यात निर्जंतुकीकरणाचे फवारे मारण्यात यावे. तसेच, पशुपालकांनी काळजी घेतल्यास लंपी या संसर्गजन्य आजाराला आळा घालता येणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी रुद्रवंशी यांनी सांगितले.
बागलाण या कृषी समृद्ध तालुक्यात मोठ्या प्रमाणत पशुपालक असून लाखाहून अधिक जनावरे तालुक्यात आहेत. मात्र त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील अनेक आजारी व दूभते जनवारांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचण निर्माण होते. तसेच अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही तालुक्याला पशुवैद्यक मिळत नसल्याने तालुक्यातील पशुपालकांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना पूर्णवेळ पशुवैद्यक देण्याची मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम