राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा- मुरशेत-घाटघर-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सव नुकताच चालू झाला असून या काजवा महोत्सवात डोंगराची काळी मैना म्हणजेच रानमेवा चांगलाच भाव खात आहे. काजवा महोत्सवात डोंगरदऱ्यातील करवंद, तोरणं, आंबळे, आवळ, जांभळे, आंबे आदी रानमेवा पर्यटकांना भुरळ घालत आहे.
एकीकडे बेरोजगारीच्या विश्वात दोन हातांना कुठे लवकर काम मिळत नाही. याच परिस्थितीला आदिवासी बांधवांनी बदलवत काही दिवस का होईना स्वतःचा हक्काचा रोजगार उपलब्ध केला आहे. सध्या सर्वत्रच उन्हाची काहिली झाली असून, यंदाच्या हंगामातील रानमेवादेखील बाजारात येऊ लागला आहे. राज्यातील छोट्या छोट्या शहरांमध्येच नव्हे तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणीही रानमेवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. सध्या वर्दळीच्या परिसरात आजुबाजुंच्या खेड्यापाड्यातून आलेला रानमेवा चांगलाच भाव खात आहे.
यात करवंद, जांभळं, तोरणं,आंबळे,आवळ, असतील तसेच बांबूपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू आदींनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु असून या दिवसांत रानमेवा खाण्याची मजा काही औरच असते. या दिवसात आंबे, करवंद, आळव, तोरणं आदी फळ पिकतात तर, काही बहरण्याच्या स्थितीत असतात. मात्र हाच रानमेवा अनेकांच्या रोजगाराचे साधनही होतो. ग्रामीण भागातील मंडळी याच रानमेव्यातून उदरनिर्वाहाचे साधन तयार करतात. हाच रानमेवा तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठ्या शहरात विक्रीसाठी आणला जातो. यावर्षी मुंबईत देखील या रानमेव्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे.
Kajwa Mahotsav | हजारो काजवे लुकलूकले आणि डोळ्यांचे पारणे फिटले; काजवा महोत्सवाला पर्यटकांची गर्दी
खरंतर ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पहाटे उठून जंगलातून हा रानमेवा गोळा करतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने यात शाळेतील विद्यार्थीही सहभागी होतात. या रानमेवामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत असतो. म्हणूनच सध्या काजवा महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा घाटघर हरिश्चंद्र गड अभयारण्यात सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री २ वाजेपर्यंत रस्त्यावर रानमेवा दिसू लागला आहे. ग्रामीण भागातील आदिवासी बांधव एका टोकरीत सगळा रानमेवा जमा करून कुठं बस स्थानकाच्या बाहेर, तर कुठे टॅक्सी स्टॅन्डजवळ, रेल्वे स्टेशन किंवा रेल्वेमध्ये तर बाजाराच्या ठिकाणीही दिसत आहेत. यात टोपलीत पळसाच्या पानापासून बनवलेल्या डवण्यात करवंदाचा, जांभळाचा वाटा घालून ठेवलेला आपल्याला दिसतो.
Kajwa Mahotsav | आदिवासी बांधवाच्या उत्पन्नाचे साधन
नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अदिवासी बांधवांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा हा मोठा आधार आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणार्या या रानमेव्याला अधिक मागणी असते. सध्या करवंद, आळव, जांभळे, तोरणं, आंबे पिकू लागली असून कच्च्या करवंदांचा ठेचा करण्यावर किंवा लोणचं करण्यावर भर दिला जात आहे. मुंबई सारख्या शहरातून आलेले पर्यटक सध्या करवंदाच्या प्रेमात असून तोरणं हा फारसा प्रचलित नाही.
Kajwa Mahotsav | काजवा महोत्सव होणार हाऊस फुल्ल; नेमका काय आहे काजवा महोत्सव..?
“एक टोकरी करवंद काढण्यासाठी जवळपास तीन ते चार तास लागतात. करवंदाची जाळी ही काटेरी असल्याने मोठी मेहनत घेऊन जिकिरीने करवंद गोळा करावी लागतात. सोमवारी ते शुक्रवारी रोज सायंकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत एक पाटी खपते. यातून दोन पैसे मिळतात. यावर आमची उपजीविका होते.”
– काळू आघान, (ग्रामस्थ, घाटघर अभयारण्य)“पळसाचे, सिधाचे किंवा चांद्याच्या पानाने डोम बनून यात करवंदे, जांभळे प्रत्येकी एक डोम 10 ते 20 रुपयांना दिली जातात. एक महिनाभर का होईना रानमेव्याला काजवा महोत्सवात पर्यटकांकडून चांगली मागणी असते. रात्रीच्या वेळी काजवे बघत पर्यटक रानमेव्याचा चांगला आस्वाद आनंद घेतात.”
– गोरख उघडे (ग्रामस्थ, पांजरे गावठा)“हंगामानुसार रोजगार उपलब्ध करून उपजीविकेचे साधन म्हणून मी बांबूपासून नक्षीदार आकर्षक वस्तू तयार करून त्याची विक्री करतो. काजवा महोत्सवात, पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत येणाऱ्या पर्यटकांकडून याला चांगली मागणी असते. सिझननुसार रानमेवा, मक्याची कणसे, शेंगा, याची चांगली विक्री होते.”
– सोमनाथ उघडे (पांजरे, अपंग आदिवासी बांधव)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम