खापरखेडा शिवारात बिबट्याचा वावर

0
2

जळगाव: अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर असणा-या खापरखेडा येथील शेतकरी प्रमोद पाटील यांच्या उसाच्या शेतात अचानक बिबट्या दिसून आल्याने एकच तारांबळ उडून शेतक-यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे.

प्रमोद पाटील व त्यांची पत्नी हे दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास शेतात पिकांची पहाणी करण्यास गेले असता अचानक त्यांच्या पुढ्यात बिबट्याने उडी घेत शेतात प्रवेश केल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. प्रमोद पाटील यांनी सदर घटनेची बाब पारोळा वनपरीक्षेत्र अधिकारी शामकांत देसले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले, वन परिमंडळ अधिकारी अमळनेर पी. जे. सोनवणे , आर.बी. भदाणे , वनरक्षक आर.एस. वेलसे , श्रीमती. देवरे, सूर्यवंशी, कुंभारे, पाटील मॅडम यांनी प्रत्यक्ष घटना स्थळी भेट दिली. घटनेची सत्यता पडताळून पाहिली असता वनविभागाच्या अधिका-यांनी शेतातील व परीसरातील पदचिन्हांची खात्री करून सदर पावलांच्या खुणा ह्या बिबट्याच्याच असल्याची खात्री करून तो तापी नदीच्या दिशेने गेला असल्याची माहिती दिली. वनविभागातील अधिका-यांनी गावात जाऊन गावकऱ्यांना व शेजारील गंगापूरी , नालखेडा, मठगव्हाण व नदी काठावरील गावांना सतर्क राहण्या बाबत सूचना दिल्या आहेत.

दोन अज्ञातांवर प्राणघातक हल्ला

दरम्यान खापरखेडा शिवारात रानडूक्करांची शिकार करायला गेलेल्या इसमांपैकी दोन इसमांवर बिबट्याने प्राणघाती हल्ला केल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे. यापैकी एक गंभीर जखमी असल्याचे समजते. वनविभागाच्या अधिका-यांनी सदर अज्ञात इसमांचा शोध घेतला असता ते फरार झाले असल्याचे समजते.

” मी व माझी पत्नी दुपारच्या वेळी शेतात गेले असता आमच्या उसाच्या शेतात अचानक बिबट्या पाहिल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले. परंतू बिबट्या शेतातून नदीच्या दिशेने गेल्याने आम्ही सुदैवाने वाचलो.” – प्रमोद पाटील , शेतकरी खापरखेडा

” मी व माझ्या टिमने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पावलांच्या खुणा बिबट्याच्याच असल्याचे निश्चीत केले आहे. त्या अनुषंगाने खापरखेडा , गंगापूरी, नालखेडा, मठगव्हाण व चोपडा तालुक्यातील नदी काठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.” – शामकांत देसले , वनपरीक्षेत्र अधिकारी, पारोळा विभाग

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here