जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; शेजारी देशांपेक्षाही भयंकर स्थिती

0
2

दिल्ली : जगातील १२१ देशांचा भूक आणि कुपोषणाचा मागोवा घेणाऱ्या जागतिक भूक निर्देशांक २०२२ जाहीर झाला आहे. त्यात भारताची गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. निर्देशांकातील धक्कादायक गोष्ट अशी, देशाचा स्थिती ही अन्य देशांपेक्षा, विशेष करून शेजारी देशांपेक्षाही भयंकर आहे.

जागतिक भूक निर्देशांकमध्ये भारताची यंदा १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पण आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांचे स्थान हे भारतापेक्षा वर आहेत. म्हणजेच, या शेजारी राष्ट्रांपेक्षा भारताची स्थिती वाईट असल्याचे या निर्देशांकात समोर आलेले आहे. तिकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची पडझड कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र, या निर्देशांकानुसार इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

२०२१ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत १०१ व्या स्थानावर होता. मात्र यंदाच्या निर्देशांकात भारताला एकूण निकषांवर २९.१ इतके मानांकन मिळाल्यामुळे भारताची यादीत घसरण झाली आहे. त्यामुळे १२१ देशांमध्ये आता भारत १०७ व्या स्थानावर आहे. मात्र, तरीही हे स्थानही भारतातील भूकेसंदर्भातील गंभीर परिस्थिती विशद करण्यासाठी पुरेसे ठरले. तर दुसरीकडे, भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते. दरम्यान, या यादीत सर्वात तळाला येमेन हा देश असून सर्वात वरच्या स्थानावर चीन आणि कुवेत या आशियायी देशांचा समावेश आहे.

काय आहे हे जागतिक भूक निर्देशांक ?

‘कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि ‘वेल्थ हंगर लाईफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी ही यादी प्रसिद्ध केली जाते. जगातील १२१ देशामध्ये उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीवरून भूकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या त्या देशांचे मूल्यांकन हे दरवर्षी केले जाते. त्यानुसार त्यांचे मानांकन दिले जाते. या निर्देशांकानुसार ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते. तर १० ते १९.९ पर्यंत असल्यास परिस्थिती बरी, २० ते ३४.९ या दरम्यान मानांकन असल्यास गंभीर असते. जर मानांकन ३५ ते ४९.९ दरम्यान असल्यास स्थिती चिंताजनक आणि ५० च्यावर मानांकन असल्यास परिस्थिती भीषण असल्याचे यात मानले जाते.

दरम्यान, ही यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात. ज्यात देशाचे कुपोषण, पाच वर्षांच्या खालील मुलांना त्यांच्या उंचीच्या तुलनेत किती कमी आहार मिळतो, पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे आणि दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुले भूकमारीमुळे दगावतात, हे या निकषांच्या आधारे सदर निर्देशांकाची मांडणी केली जाते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here