Skip to content

ठाकरेंच्या ‘मशाली’नंतर आता शिंदेंचे ‘ढाल-तलवार’ वादाच्या भोवऱ्यात


मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव व ‘ढाल-तलवार’ चिन्ह दिले होते. मात्र, आता ठाकरे गटाप्रमाणेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे नवे चिन्ह वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे.

शिंदे गटाच्या या ढाल-तलवार चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला एक निवेदन पाठवले आहे. ज्यात त्यांनी असे म्हटलेलं आहे, की ज्याप्रमाणे त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणाने शिवसेनेच्या दोन्ही गटाला नाकारले, त्याचप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचे धार्मिक प्रतीक आहे. त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगाने द्यायला नको होते. मात्र, या संदर्भातील योग्य तो निर्णय झाला नाही झाला तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे.

तसेच खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळते-जुळते असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणीही सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी निवेदनात केली आहे. तसे निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्ह वादात सापडली आहेत. याआधी ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला, तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. आधीच दोन्ही गटाने धनुष्यबाण व शिवसेना नावावर दावा केल्यामुले सदर नाव व चिन्ह आयोगाने गोठवत दोघांना वेगवेगळे नाव व चिन्ह दिले गेले खरे. पण त्यातही या दोन्ही गटाच्या चिन्हावर आता आक्षेप आल्याने दोघांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या चिन्हावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!