द पॉईंट नाऊ: महानगरपालिकेची तसेच पोलीस मुख्यालयाची कुठलीही परवानगी न घेता संपूर्ण शहरामध्ये दसरा, कोजागरी पौर्णिमा तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोरदार बॅनरबाजी करून आपली फुकटात व स्वस्तात बॅनरबाजी करण्याचा प्रकार सर्रास घडत असून, सिडको व अंबड परिसरात हे प्रमाण अधिक असून, यात राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच इच्छुकांचाही भरणा अधिक आहे.
शहराचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात विनापरवानगी बॅनरबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली होती. तसेच संबंधितांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. नवनिर्वाचित पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या काळात मात्र माजी आयुक्तांनी दिलेले निर्देश आता पायदळी तुडविले जात असून, फुकटची चमकोगिरी करणारे राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते बॅनरबाजी करून शहर विद्रूपीकरण करीत आहेत. या बॅनरबाजीमुळे सिडको व परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन छोटे, मोठे अपघात होत आहेत. असे असतानाही मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मनपाने नेमून दिलेल्या जागेवर बॅनर न लावता ते मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या मधोमध तसेच सार्वजनिक ठिकाणी चौकाचौकात बॅनरबाजी करण्यात येत आहेत. मनपाने अनधिकृत बॅनर्स हटवावेत व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभाग उपाध्यक्ष सागर चौधरी यांनी केली आहे.
■ सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, पाथर्डी फाटा, तोरणानगर, महाले फार्म, राणेनगर, लेखानगर, उत्तमनगर, उपेंद्रनगर, गणेश चौक, स्टेट बँक चौक, अंबडगाव हे बॅनर बाजीचे केंद्रे आहेत.
■ बॅनर बाजी करताना अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले असून काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेची परवानगी घेऊन बॅनर लावले असले तरीही काही महाभागांनी परवानगी न घेता अनधिकृत बॅनर रस्त्यात तसेच चौका चौकात लावले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम