Igatpuri | सार्वजनिक विहिरीतील पाणी गायब; महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या

0
28
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद |  इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सोनोशी येथे गेल्या तीन चार महिन्यांपासून गावात तीव्र पाणी टंचाई असून या पाणी पुरवठा व्हावा यासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, अद्यापही ग्रामस्थांच्या या पाणी प्रश्नांकडे कोणीही लक्ष्य दिलेले नाही.

विद्यमान सरपंच ताई दिलीप पोटकुले यांचा कार्यकाळ नुकताच संपला असला. तरी त्या पदावर असतानाच हा पाणी प्रश्न निर्माण झालेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या सोनोशी येथे ग्रामपंचायतीला प्रशासक असून संबंधित प्रशासक व माजी सरपंच यांनी या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी इगतपुरी पंचायत समिती स्तरावर केली आहे.

Igatpuri | रातोरात पाणी गायब कसे काय होते..?

सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत सोनोशी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची विहीर ही माजी सरपंच शेतकरी वाळू सोमा धोंगडे यांच्या मालकीच्या गटात असून, सदर विहिरीची जागा दान पत्र, बक्षीसपत्र करून गावासाठी दिलेली आहे. या सार्वजनिक विहिरीत गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या एकूण तीन मोटार असून या गावकीच्या विहिरीला चांगले पाणी आहे. मात्र, रातोरात विहीरीतील पाणी गायब कसे काय होते..? असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. तर गावच्या विहिरींनी तळ गाठला असून सध्या गावाला टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे सरपंच पोटकुले यांनी सांगितले. एकाच विहिरीत तीन मोटार असून विहिरीचे पाणी चोरी होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या कारणास्तव गावकीच्या विहिरीला पुरेसे पाणी असूनही गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Road Damage | रस्त्यांची झाली चाळण; सर्वतीर्थ टाकेदचा खोळंबला विकास

आंदोलन करा अथवा उपोषणाला बसा – ग्रामसेवक 

तरी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत असलेली एक मोटार काढण्यात यावी व संबंधित पाणीपुरवठा पाईपलाईन तपासून गावाला पाणीपुरवठा नियमितपणे करण्यात यावा अशी मागणी गावातील सर्व महिला ग्रामस्थांनी वेळोवेळी सरपंच आणि इगतपुरी पंचायत समितीकडे केली असून, अद्यापही या प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाने लक्ष्य दिले नाही. स्थानिक ग्रामस्थानी नुकतेच पदावरून विसर्जित झालेल्या सरपंच पोटकुले यांना पाणी प्रश्नासंदर्भात विचारणा केली असता, आता मी पदावर नाही. हे सर्व अधिकार प्रशासकांना आहे, असे उत्तर त्यांनी दिले. तर, एकतर आंदोलन करा अथवा उपोषणाला बसा… मगच गावचा पाणी प्रश्न सुटेल असे ग्रामसेवक कुंडलिक राऊत यांनी ग्रामस्थांना सांगितले.

महिलांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ 

यानंतर सोमवार (ता.१३) सकाळी दहा वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले. सोनोशी येथील ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने प्रत्येक कुटुंबाला चार ते पाच हंडाभर पाणी मिळत आहे. परिणामी सोनोशी गावच्या पाणी प्रश्न कोण सोडविणार..? गावच्या विहिरीला पाणी असूनही सोनोशी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यावाचून वंचित का राहावे लागत आहे..? ग्रामस्थांना टॅंकरच्या सहाय्याने किंवा उन्हातान्हात भटकंती करत पाण्याच्या शोधार्थ रानोमाळ हिंडावे लागत आहे. तरी प्रशासनाने या पाणी प्रश्नाकडे लक्ष्य घालावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

चौकशीची मागणी

दरम्यान गेल्या दहा पंधरा वर्षात ग्रामपंचायत सोनोशी याठिकाणी शासनाकडून देण्यात आलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन, किंवा या परिसरात जलसंधारण विभागांकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडून राबविण्यात आलेल्या सर्व योजनांची चौकशी करण्यात यावी. जर योजना मंजूर झाल्या व त्या पूर्ण देखील झाल्या. तर याचा गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी नक्की फायदा झाला का..? व गावकीची विहीर खोदकाम कोणत्यासाली करण्यात आली. त्यासाठी घेतलेली जमीन त्यावेळेस बनवलेले कागदपत्रे याची संबंधित प्रशासन यंत्रणा यांनी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी तरुण वर्ग व ग्रामस्थांनी केली आहे.

Sarvtirth taked : म्हैसवळण घाट रस्त्यासंदर्भात मनसेचे इगतपुरी तहसीलला निवेदन

येत्या आठ दिवसात गावचा पाणी प्रश्न सुटला नाहीच तर लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तरी प्रशासनाने वेळीच या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालावे व सोनोशी गावचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणपत पेढेकर, तुषार पेढेकर, खंडू भांगरे, सचिन धोंगडे, माधव घाणे, लालमन भांडकोळी, दीपक धोंगडे, आकाश धोंगडे, सीताराम खोंडे, वसंत पेढेकर, सचिन धोंगडे, रामदास पेढेकर, आदींसह सर्व सोनोशी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here