Skip to content

धक्कादायक ! महाविद्यालयीन विद्यार्थी करतायत वन्यप्राण्यांची तस्करी; नाशिकच्या घटनेने खळबळ


नाशिक : एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कृषिनगर भागात. मंगळवारी (दि. २०) काॅलेजराेडजवळ कृृषिनगर जाॅगिंग ट्रॅक येथे तीन महाविद्यालयीन विद्यार्थी वन्यप्राण्यांची तस्करी करत असताना वनविभागाने धडक कारवाई करत त्यांना रंगेहाथ पकडले आहे. या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, वनविभागाने त्या तिघा महाविद्यालयीन तरुणांकडून बिबट्याची कातडी व नीलगायी तसेच चिंकारा प्राण्याची शिंगे हस्तगत केली आहे. मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे व पश्चिमचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या विशेष वनपथकाने ही धडक कारवाई केली आहे.

वनविभागाची गेल्या दाेन आठवड्यातील ही तिसरी माेठी कारवाई असून वनविभागाच्या सततच्या कारवायांमुळे वन्यप्राण्यांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग उघड झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

यावेळी अधिक माहिती अशी, वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून त्या तिघा तस्करांशी संपर्क साधला. व त्याआधारे वनविभागाकडून मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कृषीनगर जॉगिंग ट्रॅक जवळील सायकल सर्कल येथे सापळा रचण्यात आला. तेव्हा तीन संशयित विद्यार्थी वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करतांना सापडले. तिघांच्या साखळीत अन्य साथीदार असण्याची शक्यता असून या कारवाईत एका बिबट्याची कातडी, २ चिंकारा व नीलगायीची दाेन शिंगे, दाेन मोबाईल संशयितांकडून हस्तगत केलीत आहे. तसेच, ह्या तिघांवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनखात्याने याआधी इगतपुरी व पेठ महामार्गावर अश्याच प्रकारे सापळा रचून संशयित चाैघांकडून बिबट्याची कातडी हस्तगत केली हाेती. मात्र, त्यावेळी वनपरिक्षेत्र आधिकाऱ्यांना हवेत गाेळीबार करावा लागला हाेता. कारवाईनंतरच्या तपासात चाैघांपैकी एका वन्यजीव तस्कराच्या घरातून गिधाडाचे अवयव हस्तगत करण्यात आले हाेते. त्यानंतर मंगळवारी शहरातून ही धडक कारवाई करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!