Fake Medicine | राज्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते बाहेरील राज्यांतून मोठ्या प्रमाणात औषधं खरेदी करतात.यामुळे राज्यात बनावट औषधांची आवक आणि विक्री होण्याची शक्यता बळावली आहे. त्याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आपल्या सर्व विभागीय सह आयुक्त, सहायक आयुक्त आणि औषध निरीक्षकांना बाहेरील राज्यातून येणाऱ्या किरकोळ आणि घाऊक औषधांचे स्कॅनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे परिपत्रक FDAने जारी केले आहे.
देशातील सर्वाधिक औषधे हिमाचलच्या बद्दी परिसरात तयार होत असतात. त्यानंतर गुजरात, उत्तरांचल प्रदेश आणि उत्तर-प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती होते. FDAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या राज्यांमधून येणारी अनेक औषधं मानकांशी जुळत नसल्याने नागरिकांना बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे मिळतात. महाराष्ट्रातदेखील इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात औषधं येतात. त्यामुळे राज्यात बनावट औषधांचा पुरवठा आणि विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच FDA ने कडक पावले उचलली आहेत.
FDA आयुक्तांनी सर्व सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि औषध निरीक्षकांना इतर राज्यांतून येणाऱ्या औषधांचा तपशील दररोज उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने एक खास E-Mail आयडी तयार करून किरकोळ ते घाऊक विक्रेत्यांना त्याची जाणीव करून द्यावी, अशा सूचनादेखील केल्या आहेत. त्या सोबतच इतर राज्यांतून खरेदी केलेल्या औषधांच्या बिलांसह दैनंदिन तपशील E-Mail वर पाठवण्याचे आदेशदेखील औषध विक्रेत्यांना त्यांच्या स्तरावर देण्यात आल्याचेदेखील सांगण्यात आले. इतर राज्यांकडून औषधे खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांच्या आवश्यकतेनुसार E-Mail द्वारे दररोज आलेल्या नोंदी नियमित तपासल्या गेल्या पाहीजे. या तपासणीत अनियमितता आढळून आली तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करा इ. सूचना FDA आयुक्तांनी परिपत्रकात दिलेल्या आहेत.
मुख्यालयात अहवाल सादर केला जाणार
FDA चे सहआयुक्त भूषण पाटील यांनी आदेश जारी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. प्रत्येक कार्यालयाने जिल्हा आणि विभागीय स्तरावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय कार्यालयामार्फत मुख्यालयाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम