देवळा तालुक्यात लोकप्रतिनिधींना गाव बंदी करणार ?

0
3
देवळा येथे शेतकरी बैठकीत मार्गदर्शन करताना प्रा .यशवंत गोसावी समोर उपस्थित शेतकरी वर्ग (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : आपल्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलत नसतील तर आपण बोललं पाहिजे, आणि आपल्या प्रश्नावर बोलत नसलेल्या लोकप्रतिनिधींना गावबंदी केली पाहिजे. असा सूर देवळा येथील पक्ष, संघटना विरहित आयोजित शेतकरी बैठकीत उमटल्याने, येत्या काही दिवसात देवळा तालुक्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना गाव बंदी होऊन, शेतकरी प्रश्नी मोठा लढा उभा राहणार असल्याचे चित्र आयोजित बैठकीत स्पष्ट झाले आहे.

देवळा येथे शेतकरी बैठकीत मार्गदर्शन करताना प्रा .यशवंत गोसावी समोर उपस्थित शेतकरी वर्ग (छाया – सोमनाथ जगताप)

शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी मंगळवारी दि.२३ रोजी या बैठकीसाठी शेतकरी बांधवाना आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने देवळा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीला हजेरी लावत आपले मत मांडली.

आपण संघटित नाहीत म्हणून आपल्या शेतमालाला बाजारभाव नाही, यावर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर यासाठी सर्वानी राजकीय जोडे बाजूला ठेऊन संघटित होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आपल्या प्रश्नावर बोलत नसतील तर आपण स्वतः बोललं पाहिजे. असे मत यावेळी शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले. ते पुढे बोलतांना म्हणाले की, आज नाफेडची खरेदी सुरू व्हावी यासाठी आपण आग्रही आहोत. मात्र नाफेड ही शेतकरी हिताची नव्हे तर ग्राहक हिताची कंपनी आहे. नाफेड, अनुदान, यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना शासनाने आखल्या पाहिजे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेल सुरू असतांना केंदीय मंत्री खेळ महोत्सवात व्यस्त असल्याचे नमूद करत त्यांनी राजकीय व्यवस्थेवर देखील ताशेरे ओढले.

कुबेर जाधव यांनी यावेळी जिल्हा बँक अल्पभूदारक शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. जाहीर केलेले अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कांद्याला अनुदान देतांना फक्त पावसाळी कांदाच का? उन्हाळी कांदा आज मातीमोल भावात विकला जात असतांना त्याला अनुदान का नाही, असे सवाल सुनील पवार यांनी उपस्थित केले. विरोध म्हणून नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

कांदा प्रश्नी आवाज उचलला तर तो केंद्रापर्यंत पोहचला पाहिजे. त्यासाठी आहेरांनी पक्षाला घरचा आहेर दिला पाहिजे. असे नाव न घेता आमदार व खासदार यांनी ठोस पाऊल उचलली पाहिजे या शब्दात शशिकांत निकम यांनी लोकप्रतिनिधी यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आमदार , खासदार सामान्य जनतेचे फोन चालत नाहीत मग समस्या कुणाकडे मांडाव्या तेच कळत नसल्याचे विनोद आहेर यांनी सांगितले.

कांदा उत्पादक एकत्र आला तर आपले कांद्याचे दर देखील आपण ठरवू शकतो. यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे राजू शिरसाठ यांनी सांगितले. माझ्या कांद्याला भाव मिळावा यासाठी आपण आजपर्यंत काय केले? हा प्रश्न आपण स्वतःला विचारा. आपला जिल्हा पिकवायला अग्रेसर आहे मात्र विकायला कमी पडत असल्याची खंत तुषार शिरसाठ यांनी व्यक्त केली. आज जर काही शेतकरी बांधवांकडे कांदा नसले त्यांनी मला काही गरज नाही असे म्हणून मागे राहू नये. त्यांनी या जनआंदोलनात उतरावे. या गोष्टीचा फायदा भविष्यात सर्वाना होणार आहे. असे दीपक पवार यांनी सांगितले. आंदोलन होतात मात्र शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत नसल्याची खंत माणिक निकम यांनी व्यक्त केली. आजच्या बैठकीत जो काही निर्णय होईल त्याला आमचा पाठिंबा असेल असे संजय दहीवडकर यांनी सांगितले. आंदोलन घराघरात कसे पोहचेल यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे कृष्णा जाधव यांनी सांगितले.

शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा सतीश ठाकरे यांनी सांगितले की, आजची परिस्थिती शेतकरी वर्गासाठी खूपच बिकट आहे. मात्र परिस्थिती कशीही येउद्या संघर्ष करा, लढा द्या प्रश्न सुटतील परंतु खचून जाऊन टोकाचे पाऊल कुणीही उचलू नका. शेतकरी एकत्र झाला तर शेतीचे कायदे आपल्या बाजूने होऊ शकतात. हे मागील काळात सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज रोजी उन्हाळ कांद्याला अनुदान मिळणे खूप गरजेचे असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

बैठकीत खालील खलील निर्णय घेण्यात आले.
१) तालुक्यातील प्रत्येक गावातील एक प्रतिनिधी घेऊन संघर्ष समितीची स्थापना करणार.
२) गावागावात सभा घेऊन शेतकरी जनजागृती करणार.
३) लोकप्रतिनिधी यांना गाव बंदी करणार, गावागावात तसे बॅनर लावणार.
४) उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा. यासाठी स्वामिनाथन आयोग लागू व्हावा यासाठी गावागावातील ग्रामसभेचे ठराव करणार. यासह अन्य काही निर्णय घेण्यात येऊन लवकरच या आंदोलनाची सुरवात केली जाणार असून, यासाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी याला पाठिंबा दर्शवला आहे.बैठकीस काशिनाथ पवार, मविप्र संचालक विजय पगार, सुभाष पवार, , पंडितराव निकम, , शशीकांत निकम,लक्ष्मण निकम, महेंद्र आहेर, संजय सावळे , बाळासाहेब सोनवणे, समाधान महाजन, योगेश पवार, पंकज सुर्यवंशी , धनंजय बोरसे, संजय देवरे ,माजी जि प सदस्य यशवंत शिरसाठ आदींसह
तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here