वाजगाव येथे वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्कीट होउन लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान

0
2
वाजगाव येथे शॉर्टसर्कीट झाल्यामुळे लागलेल्या आगीत शेतातील मक्याची कणसे व चारा जळून खाक झाला.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील संदीप रमेश देवरे यांच्या शेतावरील वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्कीट होउन लागलेल्या आगीत शेतातील तीस क्विंटल मक्याची कणसे, तसेच तीन ट्रॅली चारा जळून खाक झाल्यामुळे सदर शेतकऱ्याचे अंदाजे ४२ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

वाजगाव येथे शॉर्टसर्कीट झाल्यामुळे लागलेल्या आगीत शेतातील मक्याची कणसे व चारा जळून खाक झाला.

वाजगाव वडाळे रस्त्यावर राहणारे शेतकरी संदीप देवरे यांनी त्यांच्या ३२ गुंठे क्षेत्रात ( गट नं. ५६४ ) असलेल्या मका कापणीचा मक्ता गावातील मजुरांना दहा हजार रूपयांना दिला होता. मजुरांनी सोमवारी शेतातील मका कापणी केली होती. खुडलेली मक्याची कणसे शेतातच पडलेली होती. शेतावरून वीज कंपनीच्या वीज वाहक तारा गेलेल्या होत्या.

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता लोड शेडींगच्या वेळापत्रकानुसार वीज आली व हया लोंबकळणाऱ्या तारांवर बसलेले पक्षी उडाल्यामुळे तारांना हेलकावा बसून शॉर्टसर्कीट झाले व ठिणग्या उडून शेतात पसरलेल्या मक्याच्या चाऱ्याने पेट घेतला. आग लागल्यानंतर परीसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु शेतात पसरलेल्या सर्व चाऱ्यानेच पेट घेतल्यामुळे आग विझविणे अशक्य होऊन सर्व चारा व मक्याची कणसे जळून खाक झाली.
घटनेची माहीती मिळताच सहा. अभियंता जितेंद्र देवरे व त्यांचे सहकाऱ्यांनी शेताला भेट देऊन पाहणी केली, तसेच सदर घटनेबाबत इलेक्ट्रीकल अभियंता यांना कळविण्यात आले असल्याची माहीती देवरे यांनी दिली आहे.तलाठी कुलदिप नरवडे यांनी पीक नुकसानीचा पंचनामा केला आहे.

संदीप देवरे यांनी वीज कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. लोंबकळणाऱ्या तारांमुळे दरवर्षी शॉर्टसर्कीट होऊन आग लागण्याच्या घटना घडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. वीज कंपनीने हया सदोष तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here