नागरिकांनो सावधान ! , देवळा शहरात चोरीच्या घटना वाढल्या ; पोलिसही मैदानात

0
2
देवळा शहरात वाढत्या चोऱ्या रोखाव्यात या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना देताना स्वामी समर्थ नगर मधील रहिवाशी कौतिक पवार, प्रमोद मेधने ,वासुदेव देवरे ,महेश गोसावी आदींसह महिला आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : शहराला गेल्या वर्षभरापासून कुणाची नजर लागली कुणास ठावूक मात्र या प्रामाणिक अन् कष्टकरी देवळा नगरीत राजरोज घरफोड्या वाढल्या आहेत. आदर्श असे उच्चशिक्षित गावात नेमकी चूक कुठ होते, चोरांची हिम्मत कशी वाढली हा प्रश्न आता संशोधनाचा आहे. गेल्या वर्षभरात चोरीचा आलेख हा चढताच आहे मात्र गुन्हेगारांना पोलिसांचा वचक का नाही याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गणपती विसर्जनावेळी मोबाईल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले त्याच कौतुक करायलाच हवे, पोलिस प्रशासन कारवाईसाठी मैदानात असले तरी त्यांना अद्याप हवे तसे यश आलेले दिसत नाही हे ही तितकेच खरे आहे.

देवळा पोलिसांनी महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील आरोपींच्या मुसक्या तात्काळ आवळ्यात, सावकी विठेवाडीची घटना मोठ्या शिताफीने सांभाळली, निवडणुकाही शांततेत पार पाडल्या, वासोळ चा मुलगाही शोधला , एका अनवाणी विद्यार्थिनीला चप्पल देत माणुसकीही जपली साहेब या आपल्या कार्याला सलाम केलाच पाहिजे मात्र यावरच आम्ही खुश होवून तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष कसे करायचे ? , मान्य आहे तालुक्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी अन् व्याप जास्त आहे, याचा पाठपुरावा वरिष्ठांच्या दरबारी होणे देखील गरजेचं आहे. आणि तालुक्यात जे काही भीतीचे सावट आहे त्याला घालवण्यासाठी पोलिसांनीच कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

शहरात एका कॉलनीत मुलगा आपल्या वडिलांच्या भरणी श्राद्ध साठी गावी गेलेला असताना त्याच्या घरावर चोरांनी डल्ला मारला, नागरिक आता घर सोडायला घाबरायला लागले. मुलं बाळांच्या मनात भीती बसली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मुक्तपणे वावरण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई अपेक्षित आहे. वरिष्ठांनी देखील पोलिस प्रशासनातील खाली जागांवर कर्मचारी तात्काळ देणे गरजेचं आहे.

काय म्हणता नागरिक……

फेरीवाल्यांना मज्जाव करा…
शहरात तरुणाईने अलर्ट रहावे, गैर हालचाली आढल्यास पोलिसांना कळवावे, नागरीकांनी सतर्क राहून बाहेर लाईट लावणे गरजेचे आहे. आपलं वाहन सुरक्षित लॉक करून ठेवले पाहिजे, तसेच गावात जे फेरीवाले येतात त्यांच्याकडे लक्ष्य दिले पाहिजे. त्यांची विचारपूस केली पाहिजे त्यांना नगरमध्ये येण्यास बंदी घातली पाहिजे व तसे आढळल्यास वेळोवेळी पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा.
कौतिक पवार, उद्योजक, देवळा

शहरात सीसीटीव्ही बसवा…..
नागरिकानी सतर्क रहावे शहरात फेरी वाले साडी वाले यानां घरी येवू देवू नये, तसेच या परिसरात नगरपंचायत ने सिसिटीवि कॅमेरा बसवावेत ऑनलाइन ज्या काही वस्तू मागवता त्या लोकांना घराचा पत्ता देऊ नका एखाद्या चौकातील पत्ता द्यावा, या घटना घडणार नाही या सतर्क रहावे.
वनिता शिंदे , राष्ट्रवादी महिला आघाडी

पोलिसांना सहकार्य करत परिस्थितीवर मात करू…
पोलिस आपले काम चोख पार पाडताय मात्र नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, शहरात वाढलेली चोरी ही गंभीर बाब असून पोलिस व नागरिकांनी एकत्रित येत ही परिस्थिती हाताळली पाहिजे. शहरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवावे कुणाला काही अडचण असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा.
जितेंद्र आहेर, गटनेते भाजपा

तरुणाईने या घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी युवकांनी अलर्ट रहावे जेणेकरून ही घटना टाळता येईल. पोलिसांनी देखील गस्त वाढवली पाहिजे कॉलनीत येवून या संदर्भात नागरिकांना सोबत असल्याचा विश्वास देणे गरजेचं आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल सद्या मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून यासाठी वज्रमूठ गरजेची आहे.

हितेश पगार, रहिवाशी

पोलिसांचे आवाहन…..!
अलीकडे देवळा शहर व देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात चोरी /घरफोडी सारखे प्रकार घडले आहेत. जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे पोलीसांचे आद्य कर्तव्य आहे. आम्ही आमच्या वतीने अशा घटनांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे असले तरी नागरिकांनी थोडे जागरूक राहणे आवशयक आहे.

भंगार जमा करण्यासाठी , भिक्षा मागण्यासाठी ,काही साधू व महिला अनाथ आश्रमाच्या मदतीसाठी , तसेच खुर्च्या, चटई, भांडी विकण्यासाठी, ब्लॅंकेट, महिलांचे कपडे विकण्यासाठी असे निरनिराळ्या कारणासाठी लोक शहरात व ग्रामीण भागात दारोदार फिरत असतात त्यांचे वेशात काही गुन्हेगार व चोरटे फिरून ते परिसराची तसेच बंद घरांची पहाणी करून रात्रीचे वेळेस बंद घर फोडून चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांना आवाहन वजा सूचना करण्यात येते की, शक्यतो अशा लोकांकडून वस्तू खरेदी करू नका.

महिलांचे दागिने पॉलिश करून देण्याचे बहाण्याने देखील लुबाडणारे लोक आहेत. आशा लोकांना थारा देऊ नये. आशा लोकांविषयी काही संशय आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती देणेस विनंती आहे. कोणी नागरिक बाहेर गावी जाणार असेल तर त्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी. जेणेकरून शेजाऱ्याचे लक्ष राहील. शक्य तो बाहेर गावी जाताना मौल्यवान वस्तू रोख रक्कम घरात सोडून जाऊ नये. मोटार सायकल लॉक लावून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. अशा प्रकारे नागरिकांनी थोडी सतर्कता बाळगली तर आपल्या व आमच्या प्रयत्नास यश येऊन आपण अशा प्रकारांना नक्की आळा घालू शकतो असा माझा विश्वास आहे.

दिलीप लांडगे , पोलिस निरीक्षक , देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here