Skip to content

कोविड बळीतील ७१ पैकी आठच वारसदारांनी अनुदान केले परत; ६३ जणांची मात्र टाळाटाळ


नाशिक : कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या अनुदानात गडबड झाल्यानंतर प्रशासनाने जादाचे अनुदान घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. मात्र, त्यातील ७१ वारसदारांपैकी आतापर्यंत केवळ ८ वारसदारांनी जादाचे अनुदान परत केले आहे.

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजारांच्या अनुदान शासनाकडून दिले होते. मात्र, ह्यात सावळागोंधळ होऊन तब्बल ७१ वारसदारांच्या खात्यात दोनदा अनुदानाची रक्कम जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर प्रशासनाने त्या वारसांकडून जादाचे अनुदान परत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत केवळ ८ जणांनीच सदर अनुदान परत केले आहे. मात्र उर्वरित ६३ जण ह्यासाठी टाळाटाळ करत असल्याने अश्यांना नोटीस पाठवली जाणार आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून सदर अतिरिक्त रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यास अपेक्षित तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा एकदा त्यांना स्मरणपत्र देणार आहे. त्यानंतरही जर योग्य प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे संबंधितांनी सांगितले. तसेच, ह्या अनुदानात झालेल्या त्रुटींवर अधिक माहितीदेखील घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.

दरम्यान, कोविडमुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाच, शिवाय घरातील व्यक्ती गेल्याने मोठे आर्थिक संकटही त्यांच्यासमोर उभे राहिले होते. अशावेळी कोविड आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापासून वारसांना दिलासा मिळावा, यासाठी आपत्ती विभागाने वारसांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रणाखाली आतापर्यंत सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक वारसांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातूनही पात्र ठरलेल्या वारसांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले होते. मात्र, त्यातील ७१ वारसांच्या खात्यात दोनदा अनुदान जमा झाल्याची बाब उघडकीस आली होती. त्यात नाशिक शहरातील ५२, ग्रामीण भागातील १२ तर मालेगाव महापालिका हद्दीतील ७ वारसांचा समावेश आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!