Skip to content

कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत झाले विक्रमी मतदान; २४ वर्षांनी मिळणार गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष


दिल्ली : आज देशभरात काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीची ऐतिहासिक निवडणूक पार पडली असून तब्बल २४ वर्षांनी काँग्रेस पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि खासदार शशी थरुर यांच्यात ही अध्यक्षपदाची निवडणूक होत आहेत. त्यात आज पार पडलेल्या निवडणुकीत देशातून एकूण ९९०० मतदारांपैकी ९५०० मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला असून महाराष्ट्रातून एकूण ५६१ पैकी ५४७ मतदारांनी मतदान केलेले आहे. तसेच राहुल गांधी यांच्यासह ५० मतदारांनी भारत जोडो यात्रेदरम्यान असलेल्या कँपमधून मतदान केले.  म्हणजेच, ९६% विक्रमी मतदान आजच्या निवडणुकीत पार पडले आहे. येत्या बुधवारी १९ तारखेला अखिल भारतीय कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार, हे कळणार आहे. पण विशेष असे, की तब्बल २४ वर्षांनी कॉंग्रेस पक्षात बिगर गांधी कुटुंबातील व्यक्ती अध्यक्षपदावर विराजमान होणार आहे.

यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, पी. चिदंबरम, तसेच मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील अनेक कॉंग्रेस नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान बेल्लारीच्या कँपमधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मतदान पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा या निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी निवडणुकीची संपूर्ण रचना तयार करण्यात आली होती. तसा निवडणूक कार्यक्रम आम्ही कार्यकारिणीसमोर मांडला आणि कार्यकारिणीने त्यास मान्यता दिली होती. त्यानंतर राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि देशभरातून सुमारे ९९०० प्रतिनिधींची निवड झाली होती. या संपूर्ण प्रक्रियेसह आम्ही ही निवडणूक आज पार पडली.

आजच्या निवडणुकीत जवळपास ९,५०० प्रतिनिधींनी मतदान केले, म्हणजेच तब्बल ९६% इतके विक्रमी मतदान आजच्या निवडणुकीत झाले आहे. समाधानाची बाब म्हणजे, सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे मतदान केंद्रे होती तिथे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यातून आज काँग्रेस पक्षात लोकशाही नाही, असे म्हणणाऱ्यांसमोर लोकशाहीचे हे सर्वात मोठे उदाहरण आम्ही दिले आहे. तसेच, पक्षांतर्गत लोकशाही म्हणजे काय, हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध केले आहे. असे यावेळी ते म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!