Chandwad-Deola | संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा असलेल्या चांदवड-देवळा मतदारसंघात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. चांदवड-देवळा मतदारसंघात चौरंगी लढत असून, यात देवळ्यातून राहुल दादा आणि केदा नाना तर चांदवडमधून शिरीष भाऊ आणि गणेश भाऊ असे चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे यंदाही कमळ फुलणार, जुना विश्वास वरचढ ठरणार, जोरदार बॅटिंग होणार की रिक्षा सुसाट पळणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होईलच. मात्र यातच आता देवळा तालुक्यात नवीन ट्विस्ट आला असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल दादांसाठी उदय दादा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
उदयकुमार आहेर हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते तथा स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या रोखठोक आणि आक्रमक भाषणं, आंदोलनं यामुळे देवळा तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच उदयकुमार आहेर यांची भूमिका ही कायम केदा आहेरांच्या विरोधातील राहिली आहे. त्यामुळे उदय आहेर आणि केदा आहेर हे समीकरण तसे देवळा तालुक्याला परिचित आहेच आणि म्हणूनच राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ उदय आहेर यांनी देवळ्यात सभा घ्यावी, अशी मागणी राहुल आहेर समर्थकांकडून करण्यात येत होती. मात्र, हे शक्य झाले नसले तरी उदय आहेरांनी एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल आहेरांना पाठिंबा दर्शवला आहे आणि आपली भूमिका स्पष्ट करत नाव न घेता केदा आहेरांना टोला लगावला आहे.
Chandwad-Deola | काय म्हणाले उदयकुमार आहेर..?
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात होता. देवळ्यातील राष्ट्रवादीच्या अनेक लोकांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे माझीही भूमिका काय..? असा प्रश्न केला जात होता. मात्र, स्व. विनायक मेटे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की, जिथे आणि ज्याच्यासोबत रहाल. त्याच्यासोबत एकनिष्ठ रहा. त्यामुळे मी राष्ट्रवादी आणि अजित दादांसोबत आहे आणि महायुतीच्या उमेदवारालाच पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१० वर्ष राहुल आहेर हे आपल्याला परिचित आहे. भविष्यकाळात आपल्या मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. आपला आमदार मंत्री होणार ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्याला इत्यंभूत माहिती आहे की कोण कसं आहे. विशेषतः देवळाकरांना तर फार चांगल्याप्रकारे माहितीय. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून डॉ. राहुल आहेर यांना विजयी करा आणि मंत्रिमंडळात जाण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्या, असे आवाहन उदयकुमार आहेर यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम