Keda Aaher | ‘सागर बंगल्यावर गाजराची पोती, जो येतो त्याला गाजर’; केदा आहेरांचा फडणवीसांवर पलटवार

0
69
#image_title

Keda Aaher | विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा कालचा शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा काल नाशिकमध्ये होता. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारीवरून घडलेलं नाट्य रंगवून सांगितलं. दरम्यान, उमराणा येथे काल सायंकाळी केदा आहेर यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी सांगितलेल्या नाटकावर पडदा टाकला.

Keda Aaher | चांदवड-देवळ्यात रिक्षा सुसाट, विधानसभेत पोहचेपर्यंत थांबत नाही; केदा आहेरांना विश्वास

बंधूंच्या पायाखालची वाळू सरकली

यावेळी बोलताना, “ही उमेदवारी मी केलेली नाही. जनतेने करायला लावलेली आहे. ही गर्दी बघून गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंधूंच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यांची दयनीय अवस्था झाली असून पैसे देऊन, तीनशे रुपये रोजाने देऊन गर्दी जमवली जाते. लोहोणेरला तशीच परिस्थिती होती. अरे दहा-दहा वर्षे आमदारकी करून तुम्हाला माणसं नाही कमावता आली नाहीत. फक्त पैसे कमावता आले. तुम्ही आज सांगता देवळात काम करायची संधी मिळाली नाही. तुम्हाला देवळा तालुक्यातील गाव तरी माहिती होते का? हा केदा नाना नसता तर आमदारकी मिळाली नसती.” असं म्हणत राहुल आहेरांवर निशाणा साधला.

‘सागर बंगल्यावरती गाजराची पोती आहेत, जो आला त्याला गाजर’

पुढे बोलत, “फडणवीसांनी माझ्यावर आरोप केला. की, तिकिटाचा विषय गेला. मला देवेंद्रजींनी बोलावलं होतं. आमच्या मिटींगा झाल्या सांगितलं. सागर बंगल्यावरती गाजराची पोती आहेत. जो आला त्याला गाजर. मला म्हणे ‘तुम्हाला विधानपरिषद देतो, तुम्ही थांबा’ मी तिथून बाहेर निघालो. म्हटलं बरं विधानपरिषद देतायतं. दुसरा एक गेला, गणेश गीते त्यांनाही सांगितलं. ‘तुला विधान परिषद देतो.’ तोही बोलत होता, तुला काय सांगितलं? म्हटलं विधान परिषद. बोलतो मला बी तेच सांगितलं. अजून एकाला विचारलं, तो म्हणाला ‘कोणाला सांगू नका मला विधानपरिषद दिली.’ माझा एक पंढरपूरचा मित्र भेटला. त्याला विचारलं ‘तुझ्या तिकिटाचा काय?’ तो म्हणे ‘साहेब म्हणाले तुझं काय सर्व्हेत नाव नाही. तुझं आपण विधान परिषदेत शंभर टक्के करून टाकू.’ म्हटलं ‘कोणत्या 12 मध्ये का 6 मध्ये’ तो म्हणे ‘आत्ताच्या.’ आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो. मग ठरवलं आता याला बळी पडायचं नाही. ते म्हणे, ‘तुला तापी खोरे महामंडळ देतो.’ मी म्हटलं साहेब मी जनतेला माणूस आहे. मी काय सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही. मी जनतेत वाढलोय, मला जनतेत जायचंय.”

Keda Aaher | ‘मला तुमच्याशिवाय कोण आहे?’ केदा आहेरांची भावनिक साद; अपक्ष निवडणुक लढवणार

देवेंद्रजी म्हणाले, “तुम्ही मला आमदार द्या. मी तुम्हाला नामदार देतो. मागच्या पंचवार्षिकला आम्हालाच सांगितलं होतं. ‘तुम्हाला आमदार देतो. त्याला नामदार करा.’ पण या वेळेला तसं होणार नाही. मागच्या वेळी संधी देऊन काय निष्पन्न झालं? आता पुन्हा ते गाजर दाखवतायत. लोकांच्या भावनेशी खेळत आहेत.” असे म्हणत फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

देवेंद्रजी तुम्ही चुकलात…

तसेच, “देवेंद्रजींनी ‘बिन पगारी फुल अधिकारी’ म्हणत माझ्यावर आरोप केला. मला एक सांगा पक्षाने सांगितलं म्हणून आमदार दिला, पक्षाने सांगितलं मी खासदार दिला. मग जिल्हाध्यक्ष होतो. जिल्हाभर फिरलो, नगरसेवक केले. पक्ष वाढवला. मला पगार दिला होता? देवेंद्रजी तुम्ही चुकलात. असं नाही करायला पाहिजे होतं आणि राहुल दादा तू पण सांगायला पाहिजे होतं. मला पण मन आहे. मला पण वेदना होतात. तुम्हाला आमदार दिला तो गोड लागला, खासदार दिला तो गोड लागला. आज जे माझ्यावर आरोप केलेत. मी काय कोणाचं वाईट केलं नाही. फार सरळ मनाचा माणूस आहे. माझ्या भावाने साथ सोडली, माझ्या परिवाराने साथ सोडली. पण ही मायबाप जनता माझ्याबरोबर आहे. याच्यापेक्षा मला काही कमी नाही.” असं म्हणत केदा आहेर भावुक झाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here