त्र्यंबकेश्वर तालुक्यात निवडणुकांचे धुमशान; ५७ ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची तोबा गर्दी

0
2

द पॉईंट नाऊ: तालुका त्र्यंबकेश्वर येथील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवार (दि. २१) पासून सुरू झाली असून, पहिलाच दिवस पितृपक्षात असल्याने अर्ज दाखल करण्यापेक्षा विरोधक कोण आहेत, याची चाचपणी करण्यासाठी जास्त गर्दी झाली. तहसील कार्यालयात आज दिवसभर नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची जत्रा भरलेली दिसून आली.

सरपंच आणि सदस्य मिळून ५४९ पैकी २७५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामध्ये २९ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित आहेत. तालुक्यात एकूण ८४ ग्रामपंचायती आहे. त्यापैकी ५७ ग्रामपंचायतींची मुदत जून २०२१ मध्ये संपली. मात्र, लावणीवर गेलेली निवडणूक आता होत असल्याने ग्रामीण भागात उत्साह संचारला आहे. अगदी काल परवापर्यंत सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतल्याने वातावरण बदलले आहे.मागचे दीड वर्ष प्रशासक असल्याने अनेक विकासकामांचा खोळंबा झाला होता, तर प्रशासक म्हणून नेमलेले पंचायत समितीच्या विविध विभागांतील विस्तार अधिकारीदेखील जबाबदारीला कंटाळलेले आहेत. आप आपल्या विभागाचे नियमित काम करताना प्रशासकांना त्यांची अतिरिक्त जबाबदारी निभावताना धावपळ होत आहे. हरसूल ठाणापाडा पासून ते देवगाव भागात जवळपास १२५ किलोमीटरचा प्रवास करत कामे मार्गी लावताना कसरत करावी लागत आहे. कधी पाणीटंचाईच्या कारणाने पूल तयार करावा, तर पावसाळ्यात तो पूर येऊन वाहून जातो, अशा विविध आपत्तींना तोंड देताना तारांबळ झालेली पाहावयास मिळत आहे.

उमेदवारीचा अर्ज खरेदी आणि सादर करण्याची सुरूवात होत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात काउंटर तयार करण्यात आले आहेत. मतदानाची तारीख १३ ऑक्टोबर असून, लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच विजयाचे फटाके वाजतील आणि त्यानंतर च सोंगणी हंगामाला सुरुवात होईल, असे एकूण दृश्य आहे.

जातपडताळणीसाठी शिफारस पत्र
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती पेसाअंतर्गत येत आहेत. त्यातच थेट सरपंच असल्याने इच्छुकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. सर्व ग्रामपंचायती आदिवासी जमातीसाठी राखीव आहेत. त्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवारी अर्जाबरोबर जर जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यास त्यासाठी केलेल्या आवेदन पत्राची पावती जोडणे अनिवार्य आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सबळ कारण आवश्यक असते. त्या करिता निवडणूक लढवत आहे, असे शिफारसपत्र घेण्यासाठी त्र्यंबक येथील तहसील कार्यालयात दररोज जणू जत्राच भरत होती.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here