Skip to content

तरुणाई ई-सिगारेटच्या नशेत बेधुंद ; जाणून घ्या काय आहे ही नशा


मुंबई : सध्या तरुणांमध्ये ई- सिगारेटचे फॅड शिरले आहे. अनेक तरुण ही ई-सिगारेट घेत असतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यास ती घातक ठरते. अशा ई-सिगारेटवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेने केली आहे.

मुंबई व अन्य मोठ्या शहरांतील अनेक शाळा व महाविद्यालयीन तरुणांना ह्या इलेक्ट्रिक सिगारेटचे वेड जडले आहे. तब्बल साडेसातशे रुपयांपासून पाच हजारापर्यंत मिळणारी ही ई-सिगारेटस शिक्षकांची व पालकांची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे आरोग्यास घातक असलेल्या अश्या वस्तूवर कायमस्वरूपी बंदी घालून तरुण पिढीला वाचवण्याची मागणी राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

शासन परिपत्रकानुसार, शाळा व महाविद्यालयीन परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोल विक्रीस बंदी आहे. असे असले तरी अनेक भागात सर्रास या नियमांची पायमल्ली होत आहे. सामान्य सिगारेटसारखा याचा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट’ असते. म्हणजे तंबाखूजन्य सिगारेट न ओढता तंबाखूत असलेले निकोटिन द्रव्यरुपात शरीरात घेण्याचा मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते.

ह्या ई-सिगारेटसमुळे अनेक तरुण बळी पडत आहे, तसेच ही पिढी ह्यांमुळे बरबाद होत आहे. त्यामुळे अशा बरबाद करणाऱ्या व्यसनापासून मुलांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती भिमेश मुतुला यांनी केली आहे. तसेच जर ह्या ई- सिगारेटचा धूर वेळीच रोखला नाही तर भविष्यात शाळा-महाविद्यालये उपद्रवींचा अड्डा बनतील. यासाठी ई-सिगारेटवर बंदी आणून ह्या तरुणाईला वाचवले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कशी असते ही ई-सिगारेट ?

ही ई-सिगारेट दिसतेही अगदी साध्या सिगारेटसारखीच, पण ती आहे पेनड्राइव्ह, पेन किंवा लायटरच्या आकाराची. ह्यात फरक असा की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नसते, तर थेट द्रवरूपातले निकोटिन असते. तसेच, ही सिगारेट पेटवण्यासाठी लायटर किंवा काडेपेटीची गरज नाही, कारण या सिगारेटमध्ये एक छोटी बॅटरी असते. ही सिगारेट जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती करते, तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. त्यामुळे या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो.

तसेच ही सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. यामुळे, सिगारेट ओढल्याची निशाणी राहत नाही. याचा वापर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मधल्या सुट्टीत सर्रासपणे करतात व नेहमीप्रमाणे वर्गात बसतात. त्यामुळे काही विद्यार्थी शाळेतच पेंगलेले दिसतात. त्यामुळे ह्या सिगारेटवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!