Skip to content

Bajar sameeti election:देवळा बाजार समिती निवडणूक; अंदर की बात है, यह सब साथ है !


Bajar sameeti election: बाजार समिति निवडणूक जाहीर झाली आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी दंड थोपटले. मात्र हे दंड जनतेला भ्रमित करण्यासाठी थोपटल्याची कुजबूज जुन्या जाणत्या नागरिकांमध्ये रंगली आहे. बाजार समिती अस्तित्वात आल्यानंतर काय राजकारण झाले प्रशासकीय पॅनलच्या हाती सत्ता होती. ती पॅनल कशी सत्तेत बसली हे आपण बघितले. मात्र पहिली पंचवार्षिक निवडणुक कशी झाली त्यानंतरचा बाजार समितीचा प्रवास आजच्या लेखात आपण बघणार आहोत. (Bajar sameeti election)

‘नाना’ – ‘आबा’ वज्रमूठ दाखवणार की सत्ता वाटून घेणार ? ; देवळा बाजार समिती निवडणूकीत विक्रमी अर्ज

दोन नेतृत्व एकत्र (संग्रहित छायाचित्र)

देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची २००९ ला पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मोठी रंगत भरेल असे वाटत होते. मात्र नुकतेच वसाकामध्ये जे. डी. पवार यांनी सत्ता खेचून आणली होती. यामुळे देवळ्याच्या राजकारणात नवे नेतृत्व भविष्यातील राजकारणासाठी पर्याय ठरेल की काय यामुळे शांताराम तात्या आहेर आणि डॉ. डी. एस. आहेर यांनी सर्व हेवेदावे बाजूला सारून एकत्र येण्याचे ठरविले. यासाठी दोघांमध्ये त्र्यंबकेश्र्वर येथील स्वामी समर्थ मठात बैठक सुरू झाली. आणि या बैठकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला गेला व बाजार समितीत हात मे हात मिलाकर निवडणुक लढवली. यात त्यांना यश आले व जे. डी. पवार, अरुण आहेर यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावला.

Deola Bajar sameeti election: देवळा बाजार समिती निर्मिती ठरली तालुक्याच्या राजकारणाची ठिणगी

याच वेळी तत्कालीन युवा नेते केदा आहेर यांचे नेतृत्व उभारी घेत असतांना त्यांना कडवे आवाहन दिले जाईल अशी अपेक्षा होती याच वेळी योगेश आहेर देखील तात्यांचे उत्तराधिकारी म्हणून लोकप्रिय ठरत होते. वरिष्ठांची हातमिळवणी होवून एकत्रित पॅनल निर्माण झाल्याने या दोघांचे चांगभले झाले. याचाच अर्थ “नाना – आबा” दोस्ताना फार जुना आहे. जनतेसाठी हे दोघ नेते एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी प्रत्यक्षात एकमेकांचे निष्ठावंत राजकीय सोयीचे मित्र आहेत. हे देखील नाकारून चालणार नाही.(Bajar sameeti election)

२००९ साली शांताराम तात्या आणि डी एस बाबा यांच्या नेतत्वाखाली नाना आबा मैदानात हातात हात घालून उतरले. यांच्या विरोधात जे. डी. पवार तसेच तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण आहेर यांच्या नेतृत्वात पॅनल करण्यात आली. या पॅनल मध्ये फुला आप्पा जाधव, संतोष मोरे, विजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणुकीत ‘दोस्ताना’ भारी भरला आणि नाना आबा जोडगोळीने सत्ता खेचून आणली. यावेळी उदयकुमार आहेर, पत्रकार नितीन शेवाळकर यांनी देखील अपक्ष उमेदवारी केली, मात्र या निवडणुकीत धूळधाण उडत एकहाती सत्ता ‘तात्या – बाबा’ यांना मिळाली.

दुसऱ्यांदा बाजार समितीची निवडणूक २०१४ मध्ये लागली यावेळी देखील वाटा घाटी झाल्या निवडणूक बिनविरोध झाली असे जवळपास निश्चित झाले. मात्र माजी आ. शांताराम तात्या, व्हि. एम निकम , पंडित निकम यांनी शेवटच्या १५ मिनिटात चक्र फिरवले आणि निवडणूक लागली. यावेळी योगेश आबा यांना मात्र मन मारून या निवडणुकीत नानांच्या विरोधात जावे लागले. प्रचार झाला निकाल आला विरोधी पॅनलचे योगेश आहेर आणि जगदीश पवार हे विजयी झाले. मात्र यांच्या विजयात नानांचा हात असल्याची चर्चा सुरू झाली. त्याची परतफेड म्हणुन नानांच्या विरोधात चकार शब्द देखील त्यांनी गेली टर्म संपेपर्यंत काढला नाही, अशी चर्चा अजूनही सुरूच आहे. आता चर्चा आहे ती तर होणारच. याचा अर्थ चर्चा खरी आहे असे पण नाही. बाकी उभयंतांना माहिती नेमकी चर्चा खरी कि खोटी. अशाप्रकारे दोन निवडणुका केदा नाना जिंकत आलेत. मग ही निवडणूक तरी कसे ते हारणार बरे.(Bajar sameeti election)

नाना आबा जोडगोळी स्थानीक राजकारणात एकत्रच

नाना – आबा यांनी एकमेकांना विरोध जनतेला दाखविण्यासाठी केला आहे. नेहमी सोयीचे राजकारण करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित प्रवास केला आहे. गेल्यावर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली गेली. यात एका उमेदवाराला तीन ठिकाणी उमेदवारी दिल्याचा विक्रम देखील योगेश आबांच्या नेतृत्वातील देवळा राष्ट्रवादीने करून दाखवला. याचा अर्थ पक्षाचा आदेश आहे म्हणून मैदानात उतरल्याचे चिन्ह होते. स्वतः किंवा घरातील उमेदवार न देता कार्यकर्त्यांना मैदानात उतरवले यात कार्यकर्त्यांना मोठे करण्याचा मानस कदाचित असावा. यात संतोष (गोटू) शिंदे , ऐश्वर्या आहेर यांनी लढत देत विजय संपादन केला यात गोटू शिंदे यांचे सामाजिक योगदान विजयात मोलाचे ठरले. या दोन नगरसेवकांनी पक्षाची आब राखली.

यावेळी निवडणूक चुरसीची होईल असे वातावरण निर्माण केले जातेय. युवा कार्यकर्ते सोशल मिडियावर डरकाळी फोडत आहेत. मात्र या युवा कार्यकर्त्यांना ना स्वत:चा इतिहास आठवणीत, ना आपल्या नेत्यांचा स्मरणात. यामुळे पालखी वाहण्याचे काम सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांना मनातून वाटत निवडणूक झाली पाहिजे मात्र यामागचा हेतु त्यांचा जरा वेगळा पण आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरचे काम आवरले गेलेत. यामुळे जरा AC गाडीतून फिरता येईल. प्रवासात जनतेत मिसळून पक्ष वाढवता येईल कदाचित हा उदात्त हेतु यामागे असावा.

विषय महत्वाचा आहे तो देवळा तालुक्यात केदा नाना आहेर यांचा प्रमुख विरोधक कोण ? योगेश आबा यांना मानणारा वर्ग म्हणतो आम्हीच खरे नांनाचे विरोधक मात्र मागची पार्श्वभूमी बघितली तर एक जिल्हा परिषद वगळता कुठल्याही निवडणुकीत आमने सामने आल्याचे बघितले नाही. तडजोडीचे राजकारण हा देवळा तालुका बघत आला आहे. सोयीनुसार युती आणि आघाडी या शहराने नेहमी बघितली. जो नेता विरोधात राहिला त्याचे चारित्र्य हनन करण्याचे कारस्थान याठिकाणी शिजत असते. लोकशाहीला पूरक असे राजकीय पक्षाचे अस्तित्व महत्वाचे आहे. मात्र तालुक्यातील नेत्यांनी आपल्या पक्षांची विचारधारा हंगामी ठेवत वर्षभर मित्रत्वाचे धडे गिरवण्याचे काम सुरू केले आहे.

आमदार राहुल आहेर देवळ्याचे असले तरी त्यांनी सेफ साईड राजकारण करत आपली प्रतिमा वेगळी ठेवली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना सामोरे ठेवत आ. राहुल आहेर आपली प्रतिमा सेफ ठेवतात. जनतेत नकारात्मक प्रतिमा उमटल्यास त्याला सामोरे मात्र केदा आहेर यांना जावे लागते. यामुळे तालुक्यातील नेत्यांशी संघर्ष करायचा असला तरी तो नानांशीच होत असतो. नाना यांना थेट अंगावर घेण्याचे काम उदयकुमार आहेर वगळता कुणीही केले नाही. बाकी विरोधक उरलेत त्यात योगेश आबा आहेर यांच्याबद्दल आपन सर्व जाणून आहात. आबांनी बाजार समितीत असतांना किती निर्णयांना विरोध केला ? किंवा किती बैठकांना उपस्थितीत होते, हा प्रश्न संशोधनाचा भाग आहे. आंबान समवेत जगदीश पवार हे देखील आबांच्या जोडीला होते. मात्र कधी शेतकरी हितासाठी त्यांनी आवाज उठला आणि बैठक बंद पाडली असे देखील नाही. कदाचित केदा नाना यांच्या कार्यकाळात शंका घ्यावी असे कामच झाले नसावे. किंवा त्यांच्या कार्यकाळात भूतो न भविष्य असे काम झाले असावे. यामुळे योगेश आंबा शांत असतील तर त्यासाठी आबांचे अभिनंदन झालेच पाहिजे. कारण यातून असे दिसते कि आबा विकासाच्या कामात विरोधाला विरोध अजिबात करत नाही. हाच यातून अर्थ निघत असावा.(Bajar sameeti election)

असो मात्र एक नक्की देवळा तालुक्यात सध्याच्या घडीला केदा नाना यांना ना योगेश आबा भिडणार ना अजून कुणी भिडले तरी मागच्यावेळी योगेश आबा आणि जगदीश पवार हे निवडून आले ते नाना मुळेच असा संदेश यावेळी तरी जनतेत जाणार नाही याची काळजी घ्यावी इतकेच. बाकी आपण बोलत राहू बाजार समितीच्या सदरखाली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!