द पॉईंट नाऊ ब्युरो : एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला चेटकीण समजून तिला तिच्या झोपडीसह जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थानमधील अजमेर जिल्ह्याच्या मसुदा पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका गावात महिलेला काही लोकांनी चेटकीण समजून तिच्या झोपडीसह जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
मागील काही महिन्यांपासून गावातील लोक या पीडित महिलेस चेटकीण म्हणून त्रास देत होते. या कारणाने ही महिला शेतात झोपडी बनवून राहायला गेली. मात्र तिथे देखील गावातील लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी ही पीडित महिला झोपडीत असतांना, झोपडीवर पेट्रोल टाकून झोपडी पेटवून दिली. यावेळी ती महिला झोपडीतून बाहेर आली असता, तिला पकडून पुन्हा आगीत ढकलण्याचा प्रयत्न या नागरिकांनी केला. यातून स्वतःची सुटका करून घेत महिलेने पोलिसांत हा सर्व झालेला प्रकार कथन केला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेबाबत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करत आहेत.
आजच्या या आधुनिक युगात देखील अनेक लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अनेक प्रकारचे गैरकृत्य करतांना दिसुन येतात. याबाबत अनेक वेळा अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न झाले. मात्र नागरिकांमध्ये अजून देखील काही एक सुधारणा झालेली नाही. आणि याच कारणाने अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम