Skip to content

यंदाही अर्ली द्राक्ष पिक नैसर्गिक आपत्तीच्या विळाख्यातक


द पॉईंट नाऊ: २०१९ मध्ये अतिवृष्टी, २०२०, २१ मध्ये कोरोनाचे संकट, रशिया युक्रेन युद्ध आणि आता २०२२ मध्ये पुन्हा अतिवृष्टी अशा गेल्या चार वर्षांपासून अर्ली द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. ऐन सीझन असताना अर्ली द्राक्षबागा पावसाच्या विळाख्यात सापडल्याने घड कुज मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

जिल्ह्यामधील कळवण, सटणा, मालेगाव, देवळा (कसमादे ) भागात अर्ली द्राक्षांचे जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, गत चार वर्षांपासून हे शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवून कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केली आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने अर्ली द्राक्षांची छाटणी करण्यातही व्यत्यय येत आहे.

द्राक्ष बाग ऐन फुलोऱ्यात असताना जोरदार पाऊस आल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष वेलींचे कुज झाली. शिवाय बुरशी, करपा या रोगांचा प्रार्दुभाव बागांवर झाल्याचे दिसून येत आहे. रोग येऊ नये म्हणून औषध फवारणी करणेही शेतकऱ्यांना सतत चालू असलेल्या पावसामुळे शक्य झाले नाही. यामुळे यावर्षी अर्ली उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन लाखांचा खर्च पोहोचला तीन लाखांवर
खत, औषध यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. मजुरीचे दरही वाढल्याने द्राक्ष बागेसाठी यापूर्वी येणारा दोन लाखांचा खर्च आता तीन लाखांपर्यंत पोहोचला आहे. या खर्चाच्या तुलनेत जर द्राक्षाला भाव मिळाला तरच खर्चाची तोंडमिळवणी होऊन शेतकऱ्याच्या हाती काही तरी उरते असे या भागातील शेतकरी सांगतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!