Shinde vs Thackeray : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चुरस लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती फटका बसला आहे. कल्याणमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर साईनाथ तरे यांचा पक्षप्रवेश पार पडला असून या प्रवेशामुळे ठाकरे गटातून नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत.
या पक्षप्रवेशाआधीच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये “खाली स्वाक्षऱ्या करणारे जिल्हा शहर पदाधिकारी कल्याण शहर शाखेत स्वयंप्रेरणेने झालेल्या बैठकीला हजर होते. त्यांनी सर्वानुमते खालील ठराव संमत केले असून तुम्ही या ठरावांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा” असे म्हटले गेले होते.
Shinde vs Thackeray | ठरावात काय म्हटले गेले होते?
शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा आज ठाकरे गटात प्रवेश झाला. या प्रवेशामुळे अडीच वर्षे इमाने इतबारी काम करणाऱ्या, संघटनेच्या कामासाठी स्वकष्टाने, स्वतःच्या घामाने कमावलेल्या पैशांचा वापर करणाऱ्या, दबाव स्वीकारणाऱ्या, अंगावर गुन्हे घेणाऱ्या संघटनेच्या निष्ठावंतांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अशा प्रवेशाने संघटना स्तब्ध झाली आहे.
जिल्हाप्रमुख श्री. साईनाथ तरे यांच्या अंगावरती बलात्काराचे गुन्हे असूनही त्यांना संघटनेत प्रवेश दिला गेला. यामुळे संघटनेच्या सामाजिक निष्ठेच्या चेहऱ्याला धक्का लागू शकतो. आज पक्षप्रवेश करणाऱ्या तरे यांनी नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणूकमध्ये वायले नगर, खडकपाडा या त्यांच्या परिसरात आपल्या शिवसैनिकांवर दमदाटी करून त्यांना बुथदेखील लावू दिले नव्हते. या घटनेमुळे संघटनेवर व शिवसैनिकांवर खोलवर परिणाम झाला होता. निष्ठावंतांच्या मनातील निष्ठा कायम राखण्यासाठी आणि त्यांच्या निष्ठेचा सन्मान करण्यासाठी यापुढे असे प्रवेश रोखण्यात यावेत, तरी गद्दार गटातून परत येणाऱ्यांना हिंदुरुदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी जर संघटनेत थारा दिला जात असेल, तर त्यांना त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून पुढील एक वर्ष संघटनेने कुठलेही पद देऊ नये, तसेच पुढील कोणत्याही निवडणुकीसाठी त्यांना पक्षाचा उमेदवार म्हणून ग्राह्य धरू नये.
असा ठराव करून शहरातील पदाधिकाऱ्यांनी अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. तरी कार्यकर्त्यांची नारळाची ओढावून घेत उद्धव ठाकरेंनी साईनाथ तर यांना पक्षात प्रवेश दिल्याने येत्या काळात ठाकरे गटाचे पदाधिकारी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहील. (Shinde vs Thackeray)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम