द पॉइंट नाउ प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यातील वसमतमधील मामा चौक येथे पहाटेच्या सुमारास थंडीचा गैरफायदा घेत धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं समोर आले आहे. त्या ठिकाणी गुटखा वाहतुक करणाऱ्यांचे मनसुबे पोलीसांनी उधळून लावले. आज पहाटे साडेचारच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकत एका कारसह एकूण १.३५ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपी विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडू लागली आहे. रात्री ९ वाजल्या पासूनच सर्व रस्ते सुनसान होऊ लागले आहेत. तर सकाळी ९ नंतर बाजारपेठ सुरू होऊ लागल्या आहेत. रस्त्यावर देखील केवळ मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या व्यक्तीशिवाय कोणीही नसतं. या संधीचाच गैरफायदा घेत गुटखा विक्रेते सक्रिय झाले असून पहाटे तीन ते पाच वाजताच्या वेळेत गुटख्याची वाहतूक केली जात आहेत.
वसमत येथे काल सकाळी साडेचार वाजता एका कारमधून गुटखा नेत अल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंडे यांच्या पथकाने मामा चौकात जाऊन छापा टाकत कार चालक नवीनदखान पठाण याची चौकशी सुरु केली. मात्र, पोलिसांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे तो देऊ शकला नाही. त्यानंतर पोलीसांनी कारमधील पोत्यांची तपासणी केली असता त्यात प्रिमीयम राजनिवास पानमसाला, केसरयुक्त वजीर, जाफरानी जर्दाचे पोते आढळून आले.
पोलिसांनी गुटख्यांच्या पोट्यांसह कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक खार्डे यांच्या तक्रारीवरून नवीदखान इसाखान पठाण (रा. वसमत) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम