नाशिक : दिवाळी सुरु झाली. आणि ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती, त्या गुलाबी थंडीचे नाशिक शहर व जिल्ह्यात आगमनही झाले. यंदा ऑक्टोबरच्या पंधरवड्यापर्यंत बरसलेल्या पावसाने उघडीप घेताच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात घट होऊ लागली आहे.
यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस नाशिक जिल्ह्यात पडल्याने व मान्सून जास्त काळ लांबल्याने साधारणतः थंडीचा जोरही वाढणार आहे. त्याची सुरुवात आतापासूनच झाली असून आज नाशिकच्या किमान तापमानात १३ अंश सेल्सीअस, तर कमाल तापमानात ३० अंश सेल्सीअस इतकी नोंद झाली आहे. पुढील काही दिवसात कमाल तापमानात घसरण होत गेल्यास थंडीचा जोर आणखी वाढेल.
दरम्यान, शहरात गुलाबी थंडीच्या आगमनामुळे भल्या पहाटे शहरातील पांडवलेणे, चामरलेणी भागांमध्ये धुकेही दिसत आहे, त्यामुळे येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी फुलली आहे. अनेक जण थंडीत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामावर भर देत आहेत. त्यामुळे थंडीमुळे नागरिकांमध्येही एक वेगळा उत्साह जाणवत आहे.
फक्त शहरच नव्हे, तर जिल्ह्यातही थंडीचा गारवा पसरत आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड तालुक्यात चांगला पाऊस पडल्याने हा आणि तेथील आसपासचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. तसेच आलेल्या गुलाबी थंडीमुळे येथील वातावरण आल्हाददायी बनले आहे.
याचसोबत जर दिवाळीत थंडी असली तरच खरा आनंद मिळतो. कारण, दिवाळीच्या गरमागरम पदार्थाची चव त्यामुळे वाढते. म्हणून ज्या थंडीची सर्वांना आतुरता होती, ती अखेर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम