नाशिक – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
कालच जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून जवळपास ८० टक्क्यांहून अधिक मतदान जिल्ह्यात झाले होते. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी तिथल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे मतमोजणीला उशीर झाला होता. पण आता हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार जिल्ह्यातील ८८ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी, शिवसेना १३ आणि कॉंग्रेस ४ अश्या ५८ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवला आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला ६ ग्रामपंचायती आल्या.
तर १६ ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला असून माकपने ८ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, नुकत्याच स्थापित झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला नाशिक जिल्ह्यातील गणेश गाव इथल्या रुपाली ठमकेंच्या रूपाने पहिली ग्रामपंचायत मिळवत आपल्या विजयाची श्रीगणेशा केली.
नाशिक जिल्ह्यात भाजप व शिंदे गटाची पडझड झाल्याची पाहायला मिळाली असून अवघ्या एका ग्रामपंचायतींवर शिंदे गटाला समाधान मानावे लागले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालाची अंतिम आकडेवारी
एकूण जागा – ८८
राष्ट्रवादी काँग्रेस – ४१
शिवसेना – १३
भाजप – ०५
काँगेस – ०४
माकप – ०८
शिंदे गट – ०१
इतर – १६
दिंडोरीत झिरवळांंचा करिष्मा कायम
दिंडोरी तालुक्यात विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळांंचा करिष्मा कायम राहिला असून तिथल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा बोलबाला राहिला आहे. तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे. तिथे राष्ट्रवादीच्या पॅनेलचा विजय झाला असून सोनाली चारोस्कर या सरपंचपदी निवडून आल्या. तर शिंदेगटाचे भाऊलाल तांबडे यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी भाऊलाल तांबडे यांची शिंदे गटाच्या नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता त्यांच्या पराभवामुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम