नाशिकरोड : वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी २९ जुलै १९७४ रोजी स्थापन झालेले नाशिकरोडचे शासकीय ग्रंथालय सध्या अस्तित्वासाठी झगडत आहे. नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमधील रेल्वे आरक्षण कार्यालय महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. तेच संकट नाशिकरोडच्या या ऐतिहासिक ग्रंथालयावर आले आहे. महापालिकेने व्यावसायिक दराने या ग्रंथालयाकडे चार वर्षांत २४ लाखांची थकबाकीची मागणी केल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. ही थकबाकी भरली नाही तर हे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथालय धोक्यात येऊ शकते.
देवी चौकातील नाशिकरोडचे शासकीय ग्रंथालय उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत ग्रंथालय संचानालयाच्या अधिपत्याखाली काम करते. गेल्या ४८ वर्षांत या ग्रंथालयाने उत्कृष्ट संदर्भ ग्रंथालयाचा नावलौकिक मिळवला आहे. येथे ९० हजार ग्रंथ असून, दरवर्षी त्यात भर पडते. ही सर्व संपदा, तसेच २१ दैनिक, ४९ नियतकालिके संशोधक, साहित्यिक, अभ्यासकांना उपलब्ध केली जातात. तरुणांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ही संपदा विनामूल्य उपलब्ध आहे. महत्त्वाच्या भाषेतील संदर्भग्रंथ येथे असून, त्यांच्या झेरॉक्सची सोय आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी हे ग्रंथालय शाळांमध्ये जाऊन तज्ज्ञांची व्याख्याने घेणे, ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन भरवणे, वाचन प्रेरणादिन साजरा करणे आदी उपक्रमही राबवते. या ग्रंथालयाने नाशिकरोड कारागृह, सोसायटी, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये आदी ३९ सभासद केले आहेत. त्यांना २५ ग्रंथ महिनाभरासाठी दिले जातात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम