माझं आणि अमित शाहांचं हेच ठरलं होतं, भाजपच्या गेम प्लॅनवर ठाकरेंकडून प्रश्नचिन्ह


मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे जनतेशी संवाद साधला. माझं आणि अमित शाह यांचं अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यायचा, हेच ठरलं होतं, मग त्यावेळी नकार देऊन आताच भाजपने असं का केलं? असं प्रश्न आपल्याला पडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शब्द पाळला असता, तर अडीच वर्ष तरी भाजपला मुख्यमंत्रिपद मिळालं असतं, पण आता तर पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

माझ्या मनात तीन प्रश्न पडले आहेत. ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं, त्यांच्या मते त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझं आणि अमित शाहांचं हेच तर ठरलं होतं. की शिवसेना-भाजपने पुढील पाच वर्षात अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यावा, तसं झालं असतं तर आज अडीच वर्ष झालेलीच आहेत, जे काय घडलं ते सन्मानाने झालं असतं. ही आताची जोडगोळी, कदाचित अशाच पद्धतीने त्यांनी अडीच वर्ष पूर्ण केली असतं, मग त्यावेळी नकार देऊन भाजपने आताच असं का केलं, हा माझ्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यावेळी शिवसेना अधिकृतपणे तुमच्या सोबत होती. लोकसभा-विधानसभेला एकत्र होतो. लोकसभेच्या आधी जे ठरलं होतं, ते हेच होतं, मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनवायला लावलं, तसं झालं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, जे भाजपसोबत जाऊ इच्छितात त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे, की अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि पाठीत वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला, तर हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!