नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमधील मोटारसायकल थेफ्ट विरोधी पथक व नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त धडक कारवाई करत तीन सराईत दुचाकी चोरट्यांकडून चोरीच्या २९ दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, हे चोरटे ह्या दुचाकींची वाहन बाजारात विक्री करणार होते.
शहर आयुक्तालयातील परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांनी आपल्या परिमंडळातील सर्व पोलिस ठाण्यातून १० पोलिस अंमलदार व १ अधिकाऱ्यांचे पथक तयार केले होते. त्यानुसार सदर पथकाने चोरीच्या एका गुन्ह्याची माहिती मिळवली. त्यानुसार पोलिस अंमलदार विशाल पाटील, मनोहर शिंदे आदींनी संशयित दुचाकीचोर अतुल पाटील (२६, रा. मु.पो. पथराड, ता. भडगाव, जि. जळगाव) याला अंबडमधून ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी त्याचा अधिक तपास केला असता, त्याने पवन रमेश पाटील (२६, मूळ रा. जळगाव, हल्ली रा. सिडको) व ऋतिक उत्तम अडसुळे (२२, रा. दत्तमंदिर, नाशिक रोड) या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा शोध त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ह्या दुचाकीचोरांकडून पोलिसांनी अंदाजे ७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या तब्बल २९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
ज्यात नाशिकरोड पोलिस ठाण्यातील १, इंदिरानगर येथील १, सातपूर इथली १, तर नाशिक ग्रामीणकडील ४, धुळे जिल्ह्यातील ७ व जळगावातील १ असे १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्यायदे, राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
तीन महिन्यात तब्बल ६६ दुचाकींचा शोध
यावेळी परिमंडळ दोनमधील पथकाने विविध दुचाकीचोरी प्रकरणांत १२ जुलै २०२२ पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २ अल्पवयीन संशयितांसह १५ जणांना अटक केलेली आहे. ह्या सर्व चोरांकडून तब्बल २२ लाख २० हजार रुपये किमतींच्या ६६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिक शहरातील १९, नाशिक ग्रामीणचे ७, धुळ्यातील ७ गुन्हे, तर पुणे शहरातील ३, ठाणे शहरातील १ व जळगावातील १ असे ३८ गुन्हे पोलिसांनी आतापर्यंत उघडकीस आणले आहेत.
विशेष म्हणजे, ह्या संशयितांनी चोरी झालेली सर्व दुचाकी वाहने वाहनबाजारात वा परस्पररित्या कमी दरामध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करत होती व त्यातील काही विकलेही होते. सध्या त्यांच्याकडूनही वाहने जप्त केली असून, त्यांना चोरीचा माल घेतल्यामुळे आरोपी करण्याची कारवाईही पोलिसांकडून सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम