नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने नाशिकराेड परिसरातील दोन ठिकाणी छापा टाकून तब्बल १८ लाख रुपयांचा गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. नाशिकराेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने शहरात गत पाच महिन्यांपासून सदर मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून मिळालेल्या माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिकराेडमधील सुभाष राेडवरील सचदेव आर्केड येथे असलेल्या गोदामावर छापा टाकला. त्यात वैधानिक इशारा नसलेले ३ लाख ६१ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करत संपूर्ण गोदाम सील करण्यात आले.
तसेच, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील झेन मार्केटिंगच्या दाेन गोदामात गुटख्याचा साठा असल्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांच्या पथकाने धाड टाकली होती. त्यात दोन्ही गोदामांमधून ११ लाख ९८ हजार रुपयांचा पान मसाला, २ लाख ७४ हजार रुपये किमतीचे सुगंधी तंबाखू, व चार हजार रुपयांची मिराज तंबाखू असा १४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी गोदाममालक व संशयित रामविलास लोहिया, मनोज लोहिया, सोनू लोहिया व पुरवठादार आणि उत्पादकाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अन्न आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, गोपाळ कासार, संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
तीन दिवसांपासून धडक कारवाई
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून शहर व परिसरात जोरदार कारवाई सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकराेड येथील सुभाष राेडवरील सचदेव आर्केड व शिंदे गावातील लाेहिया कम्पाउंडमधील झेन मार्केटिंग या दोन्ही ठिकाणांहून तब्बल १८ लाख रुपयांचा गुटखा, तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम