Nashik breaking : इगतपुरी तालुक्यात आदिवासी महिलेचा आरोग्य सुविधांअभावी मृत्यू झाला. या घटनेचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले ही घटना म्हणजे सरकारला शोभणारे नाही. आपल्याला प्रगत म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल विचारतानाच स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात चर्चेची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले की, इगतपुरीतील एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार मिळत नाही, सुविधा मिळत नाही आणि तिचा मृत्यू होतो हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारे नाही, सरकारने या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे. इगतपुरी आणि मोखाडा या आदिवासी दुर्गम बहुल भागात केवळ सुविधा नसल्याने दोन गर्भवती महिला दगावल्या. हा मुद्दा आज विधिमंडळ अधिवेशनात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित करण्यात आला, मात्र सरकारने या विषयावर सभागृहात चर्चा नाकारली.
इगतपुरी मध्ये सरकारच्या उदासीन कारभाराचा नमुना बघायला मिळाला. इगतपुरीतील एका महिलेला प्रसूती वेदना झाल्याने तिला इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यामुळे तिला वाडीवऱ्हे येथे असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे तिचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर रस्ता नसल्याने तिचा मृतदेह डोलीतून घरी नेण्यात आला.
https://thepointnow.in/action-will-be-taken-against-the-police-officer/
महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात, जर आपण आदिवासी भागांमध्ये दुर्गम भागामध्ये, आरोग्य सुविधा देऊ शकत नसेल तर ते आपल्याला शोभणारे नाही. संपूर्ण दिवसाच्या स्तरावरच आपण महिलांच्या बाबतीमध्ये निष्काळजी असल्याचे दिसतो. आपण जेव्हा स्वतःला प्रगत म्हणून घेतो आणि दुसरीकडे महिलांना साध्या साध्या आरोग्य सुविधा मिळत नसतील तर हे अत्यंत गंभीर आहे. सभागृहात या विषयावर चर्चा व्हायलाच हवी. सरकारने धोरण ठरवायला हवे आणि उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी थोरात यांनी केली.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इगतपुरीच्या घटनेवर सरकार निश्चितपणे निवेदन करेल. अशा घटनांचे राजकारण करणे उचित नाही. राजकीयच बोलायचे झाले तर, तुम्ही इतके वर्ष सत्तेत राहून काय केले? असा प्रश्न विचारावा लागेल. पण आम्ही राजकारण करणार नाही. आमचे सरकार या प्रश्नाबाबत गंभीर आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम