The Point Special | तीन राज्यात कमळ फुललं; भाजपच्या उत्तरेतील विजयाचा नेमका अर्थ काय?

0
2

The Point Special | काल चार मोठ्या-राज्यांतील निवडणुकीमध्ये काँग्रेसविरुद्धचा थेट सामना भाजपने ३-१ असा जिंकून हॅट्रिक साजरी केली. अवघ्या चार-पाच महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांत तर आश्चर्यकारकरीत्या छत्तीसगडमध्येही भाजपने मारलेली बाजी २०२४ मध्ये लोकसभेचा कौल काय आणि कसा येणार याची चुणूक दिली आहे. तेलंगणातील विजय साजरा करण्याचीही उर्मी उरू नये, इतका हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा ठरलेला आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीच्या फार मोठ्या विजयाची बीजे या निकालात दडल्याचे आता जाणवते आहे.

 

निवडणुका झालेल्या पाच राज्यांतील लोकसभेच्या जागांची संख्या 83 होती तसेच हे निकालच लोकसभेचा कौल ठरणार, असे वाटणे स्वाभाविक असले तरी हे अगदी कोरे-करकरीत राजकारण आहे. येथे मतदारांना गृहीत धरण्याची चूक मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप कदापि करणार नाही. त्यामुळेच भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात, ‘अब लोकसभा की तैयारी करनी है,’ हीच भावना प्रत्येक नेत्याच्या देहबोलीत स्पष्ट दिसून आली. त्यामुळे आगामी काळात ‘मोदी की गॅरंटी’ हेच भाजपचे ब्रह्मवाक्य ठरेल.

मोदींची चतुःसूत्री काय?

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमार यांनी बिहारमध्ये जात जनगणनेचा पत्ता टाकला आणि भाजप त्या मुद्द्यावर अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागलेली होती. काँग्रेसच्या जवळपास प्रत्येक सभेत राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेवरून पं. मोदी यांना आव्हान दिले होते. त्यावर मागच्या आठवड्यात खुद्द मोदी यांनी तोडगा काढला आणि माझ्यासाठी गरीब, युवा, महिला तसेच शेतकरी या चारच जाती आहेत, ही मोदी यांची नवीन मांडणी जातीपातीच्या कितीतरी वर जाऊन मतदारांना भावणारी ठरल्याचे प्राथमिक चित्र चारपैकी या तीन राज्यांत दिसलेले आहे. जातीच्या म्हणजे मंडल राजकारणाला आजच्या काळात कमंडलने नव्हे, वर्गसिद्धांताच्या या नव्या व्याख्येने पूर्णतः देण्याचे सूत्र मोदींनी यशस्वीपणे वापरलेले आहे. आता तरुण वर्गासाठी मोदी सरकार एखादी मोठी योजना आणण्याचीही चिन्हे दिसत आहेत.

Crime News | बॉयफ्रेंडची शुल्लक चूक; गर्लफ्रेंडने थेट डोळ्यात घातली सुई

काँग्रेसचे गणित चुकले कुठे?

काँग्रेस पक्षाचा मतटक्का पाहिल्यास एखाद्या पराभवाने अगदीच हायपाय गाळावेत, असेही काही दिसत नाही. मुळात राहुल गांधी यांचा जातीय जनगणनेचा मुद्दा लोकांना का अपील झाला नाही? महागाई-बेरोजगारीसारखे वास्तवाचे मुद्दे परिणामकारक का ठरले नाहीत? पनवतीसारखी टीका टाळता आली नसती का? केवळ सोनिया तसेच राजीव गांधींच्या पिढीतील म्हणून पक्षसंघटनेत मोक्याच्या जागा अडवून बसलेल्या कमालीच्या उर्मट नेत्यांना वानप्रस्थाश्रमात धाडण्यास राहुल-प्रियांका गांधी यांना कधी यश येणार? यासारख्या मुद्द्यांचे चिंतन राहुल गांधी यांच्याइतकेच त्यांच्या टीमने करणे गरजेचे यावेळी ठरते.

भाजपच्या उत्तरेतील विजयाचा नेमका अर्थ काय?
भाजपने आहे तेच हिंदीभाषिक पट्ट्याचे मैदान भक्कम केले आणि याचा प्रत्यय असा की हिंदी पट्ट्यातील स्थान भक्कम करण्याची, निदान आहे ते तरी राखण्याची संधी काँग्रेसने गमावलेली आहे. मोदी-शहा यांचे पुढचे लक्ष्य दाक्षिणात्य पट्ट्यातअसल्याचे दिसत आहे. त्यातही आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू आणि अर्थात कर्नाटकावर राहणार हे स्वाभाविकच आहे. कर्नाटकात देवेगौडा यांच्या जेडीएसबरोबर भाजपने याआधीच युती केलेली आहे. तमिळनाडूत दर पाच वर्षांनी सत्ताबदल केवळ विधानसभेतच होतो असं नाही तर लोकसभेतही त्याचे पडसाद उमटतात हे लक्षात घेता अण्णाद्रमुक बरोबर पुन्हा जुळवून घेण्यासाठी भाजप जोरदार धडपड करेल असं आता स्पष्ट होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here