द पॉईंट नाऊ ब्युरो : बहीण-भावामध्ये वाद ही काही नवीन बाब नाही. मात्र बीड जिल्ह्याच्या केजमध्ये एका भावाने आपल्या नायब तहसीलदार असलेल्या सख्ख्या बहिणीवर कोयत्याने वार केले. तहसील कार्यालयातच हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या केज येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या आशा वाघ यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने तहसील कार्यालयातच कोयत्याने सपासप वार केले. आशा वाघ यांच्या डोक्यावर आणि मानेवर मधुकर वाघ याने वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील दोनडीगर येथील मधुकर दयाराम वाघ हा केज येथील तहसील कार्यालयात कोयता घेऊन आला आणि काही कळायच्या आत त्याने बहीण आशा वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. ही बाब कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी मधुकर वाघ याला पकडून ठेवले. व नंतर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतीच्या आणि अन्य कौटुंबिक वादातून मधुकर वाघ याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम