ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार, प्रवासी भाड्यात झाली इतकी वाढ

0
11
st news

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या लालपरीचा प्रवास महागणार आहे. कारण आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपल्या प्रवासी भाड्यात १०% वाढ केली आहे. म्हणजेच ७५ रुपयांपर्यंतची भाडेवाढ महामंडळाकडून करण्यात आलेली आहे.

मात्र, ही वाढ हंगामी काळासाठी असून २० ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच ही भाडेवाढ असणार आहे, असे एसटी महामंडळाने सांगितले आहे. महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाववाढ फक्त दहा दिवसांसाठीची आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहणार असून शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

तसेच, ज्या प्रवाशांनी बसचे आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. पण ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरनंतर मात्र, पुन्हा नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १४९४ एसटी बसेस सोडणार

दरम्यान, दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता महामंडळाकडून गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान चालवण्यात येणार आहेत. ह्या काळात औरंगाबाद येथून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडल्या जातील. तसेच प्रवाशांची वाढती गर्दी पाहून या गाड्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार आहे, असेही महामंडळाने यावेळी सांगितले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here