Skip to content

ठाकरेंचा सावध पवित्रा, लटके यांचा अर्ज कुरघोडी बाद केला तर ? ठेवला हा हुकमी एक्का राखून


मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके व भाजप-शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काटेकोरपणे काळजी घेतली असून काही कारणास्तव उमेदवारी बाद झाल्यास दुसरा पर्याय म्हणून शिवसेनेने लटके यांचे निष्ठावंत सहकारी संदीप नाईक यांचा देखील अर्ज भरला आहे, तर पटेल यांनी दोन अर्ज भरत दोघं पक्षांनी सावध खेळी खेळली आहे.

यावेळी अर्ज दाखल करतेवेळी आज दोन्ही उमेदवारांनी आपापल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते सहभागी झाले. तर ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व आदी नेते उपस्थित होते.

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा आज मुंबई महापालिकेने हायकोर्टाने कानउघडणी केल्यानंतर मंजूर केला आहे. सुरुवातीस मनपा प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. पण हायकोर्टातील निकालानंतर त्यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. आणि शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मागच्या निवडणुकीत शिवसेना – भाजप युती असल्याने ही जागा शिवसेनेच्या रमेश लटकेंना सोडण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, पण त्यांचा यात पराभव झाला होता. त्याचा आधार घेऊन यावेळी शिंदे गटानेही या जागेवर दावा केला होता. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, ही जागा अखेर भाजपला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी लगेच आपला अर्ज दाखल केला.

दरम्यान, आज निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अंधेरी निवडणूक कार्यालयाबाहेर मोठी शक्यता होण्याचे गृहीत धरून पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. त्यासाठी निवडणूक कार्यालयाच्या आजूबाजूचा १०० मीटर अंतरावरील संपूर्ण परिसर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून सील केला आहे.

दोन्ही पक्षाकडून सावध पवित्रा 

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला, तरी भाजप आणि ठाकरे गटाने या निवडणुकीत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. तिकडे भाजपने मुरजी पटेल यांचे दोन अर्ज दाखल केले असून, तर तिकडे ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते व मंत्री दीपक केसरकर यांनी आम्हीच मूळ शिवसेना असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील, असा दावा केला आहे. तर तिकडे ठाकरे गटानेही आमचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास केला आहे. दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक ही शिवसेना उद्धव ठाकरेंसाठी आणि शिंदे गट – भाजपसाठी मोठी परीक्षा असणारा आहे. कारण, शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!