नाशिक : नाशिकचा अष्टपैलू खेळाडू सत्यजित बच्छाव याची बीसीसीआयतर्फे आयोजित सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाच्या विजयात या डावखुरा फिरकीपटू आणि मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजाचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच मागील पाच वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजितने सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी केल्याने ही निवड झाली आहे. नाशिक क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एका नाशिककर क्रिकेटपटूला महाराष्ट्राचे कर्णधारपद मिळाल्याने सत्यजितचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे मोहाली येथे ११ ते २२ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय स्तरावर सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा खेळवली जाणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळत असतात. याच स्पर्धेत नाशिकच्या सत्यजितने २०१८-१९ मध्ये स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्राला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता. त्यावेळी महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
सत्यजितने आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत ३९ सामने खेळले असून एकूण ३८ डावात ४८ बळी घेतले आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी १८ धावात ४ बळी अशी आहे. त्याच्या ह्याच उल्लेखनीय कामगिरीमुळे गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या लिलावप्रक्रियेत समावेश झाला होता. त्याबरोबरच आयपीएल २०२२ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या शिबिरासाठी त्याची निवड झाली होती.
दरम्यान, सत्यजितच्या राज्य संघाच्या कर्णधारपदावरील निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना तसेच जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम